कुणाच्याही आहारावर सरकार बंदी आणू शकत नाही, संजय राऊत यांनी ठणकावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटकळ विधाने करण्यापेक्षा महापालिकांनी मांसबंदीचा निर्णय का घेतला हे पटवून द्यावे, असे आव्हान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले. मुळात सरकार कुणाच्याही आहारावर बंदी आणू शकत नाही, असेही ठणकावून सांगितले.

महापालिका सरकारची नसते का, प्रशासक कोण नेमते, असा सवाल केला. मुंबईसह राज्यातील 27 महापालिका खासगीरित्या फडणवीसांच्याच ताब्यात आहेत. त्यांनीच प्रशासक नेमले, निर्णयही तेच घेत आहेत. त्यामुळे त्यांनी फुटकळ विधाने करण्यापेक्षा कुठल्याही महापालिकेने मांसबंदीचा निर्णय का घेतला हे पटवून द्यायला हवे. स्वातंत्र्य दिन हा आमच्यासाठी विजयाचा उत्सव आहे. कठीण परिस्थितीत क्रांतिकारकांनी क्रांती घडवली, हा इतिहास भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी पुन्हा वाचावा, असे सांगितले.  मतदार याद्यांविषयी ते म्हणाले की, महाराष्ट्रात 58 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा व महायुतीचे उमेदवार निवडून येणे शक्यच नव्हते, तरीही ते विजयी झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेले याबाबतचे आंदोलन अधिक प्रभावी आणि मोठे होईल, भाजपा व महायुतीला हद्दपार व्हावेच लागेल, असेही त्यांनी सांगितले.