
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवत आणि अतुलनीय शौर्य दाखवत दहशतवाद्यांचे 9 तळ बेचिराख करणाऱ्या हवाई दलाच्या 9 लढवय्या वैमानिकांना लष्करी पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या लढाऊ वैमानिकांना लष्करातील प्रतिष्ठेचे वीरचक्र पदक जाहीर झाले असून त्यांची नावेही घोषित करण्यात आली आहेत.
ऑपरेशन सिंदूर वेळी या 9 वैमानिकांनी पाकिस्तानातील मुरिदके आणि बहावलपूर तसेच पाकिस्तानी सैन्याच्या तळांना अचूक लक्ष्य करत जबर घाव घातला होता. युद्धाच्या काळात आपल्या धाडशी कामगिरीने पाकिस्तानी सैन्याला जेरीस आणणाऱ्या 9 वैमानिकांना लष्करातील सर्वोच्च पदकांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे असलेले वीरचक्र पदक जाहीर झाले आहे.
हे आहेत जिगरबाज वैमानिक
कॅप्टन रणजित सिंग सिधू, कॅप्टन मनीष अरोरा, कॅप्टन अनिमेश पाटणी, कॅप्टन कुणाल कालरा, विंग कमांडर जॉय चंद्रा, स्क्वाड्रन लिडर सार्थक कुमार, स्क्वाड्रन लिडर सिद्धांत सिंग, स्क्वाड्रन लिडर रिझवान मलिक आणि फ्लाईट लेफ्टनंट आर्शवीर सिंह ठाकूर
पहलगाम हल्ला भ्याड होता. त्याला हिंदुस्थानी लष्कराने ऑपरेशन सिंदूरद्वारे चोख प्रत्युत्तर दिले. सिमेपलीकडील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. आत्मनिर्भर हिंदुस्थान मिशनची चाचणी घेण्याची ही एक संधी होती. कश्मीर खोऱ्यात रेल्वे सेवा सुरू करणे ही एक मोठी कामगिरी होती. त्यामुळे येथे व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल
– द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
हवाई दलाच्या 13 अधिकाऱ्यांना युद्धसेवा पदक
ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या हवाई दलाच्या 13 अधिकाऱ्यांना युद्धसेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यात व्हाईस चीफ एअर स्टाफ एअर मार्शल नरनादेश्वर तिवारी, वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल जितेंद्र मिश्रा, डीजी ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश भारती, एअर व्हाईस मार्शल जोसेफ सुआरेस, एअर कमांडर अशोक राज ठाकूर यांचा समावेश आहे.