
वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रणेते पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या प्रेरणेने, स्वाध्याय परिवार जन्माष्टमीचा उत्सव एका वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. या वर्षीही देशातील आणि परदेशातील सुमारे १७,००० युवक पथनाट्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. केवळ दहीहंडी फोडून नव्हे, तर श्रीकृष्णाच्या विचारांनी समाज प्रबोधन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
स्वाध्याय परिवाराची धुरा सांभाळणाऱ्या श्रीमती धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव प्रयोग गेल्या २३ वर्षांपासून सुरू आहे. या वर्षी, ‘मिल गई मंज़िल हमे’ हे पथनाट्य १० ते १७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत सादर केले जात आहे. भारत, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, बँकॉक अशा २० पेक्षा जास्त देशांमध्ये साधारणपणे पावणे दोन लाख युवक या उपक्रमात सहभागी होत आहेत.
विशेष म्हणजे, हे सर्व तरुण कोणत्याही प्रलोभनाशिवाय, आपले शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून निस्वार्थ भावनेने यात सहभाग घेतात. हे पथनाट्य मानवाला सुखाच्या शोधातील व्यर्थ धावपळ थांबवून, आपल्याच हृदयात असलेल्या ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा संदेश देते. या जाणिवेमुळेच जीवनाचा खरा आनंद मिळतो, असा विचार हे पथनाट्य मांडते.
आज जन्माष्टमीचा उत्सव केवळ दहीहंडी, उंचीचे थर आणि लाखांची बक्षिसे यापुरता मर्यादित झाला आहे. अशा परिस्थितीत, स्वाध्याय परिवाराचा हा उपक्रम समाजाला काहीतरी सकारात्मक आणि रचनात्मक देण्याचा प्रयत्न करत आहे.