
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने ऐन सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना जोरदार दणका दिला आहे. एसबीआयने गृहकर्जाच्या दरात 25 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. एसबीआयने ही वाढ नव्या कर्जदारांसाठी केली आहे. याचा थेट परिणाम व्रेडिट स्कोअरच्या ग्राहकांवर पडणार आहे. जुलैमध्ये एसबीआयच्या गृहकर्जाचा दर 7.50 टक्के ते 8.45 टक्क्यांपर्यंत होता. परंतु बँकेच्या या निर्णयानंतर आता ग्राहकांना 7.50 टक्के ते 8.70 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागू शकते. बँकेने वाढवलेल्या नव्या दराचा आधीच्या गृहकर्जावर परिणाम होणार नाही, असे सांगितले जात आहे.
आरबीआयने एमपीसी बैठकीत रेपो दर 5.55 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर एसबीआयने गृहकर्जाच्या दरात वाढ केली. ‘मॅक्स गेन’ ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी आता 7.75 टक्के ते 8.95 टक्क्यांपर्यंत व्याजदर असणार आहे. टॉप-अप कर्ज तुलनेने महाग झाले आहे, त्याचे दर 8.00 टक्के ते 10.75 टक्क्यांपर्यंत आहे. ओव्हरड्राफ्ट टॉप-अप कर्जाचे दर 8.25 टक्के ते 9.45 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. प्रॉपर्टीवर कर्ज आता 9.20 टक्के ते 10.75 टक्के दराने उपलब्ध आहे. तर रिव्हर्स मॉर्गेज कर्जे 10.55 टक्के दराने निश्चित करण्यात आली आहेत. एसबीआयने योनो इन्स्टा होम टॉप-अप कर्जाचा दर 8.35 टक्के ठेवला आहे. बँकेने स्पष्ट केले आहे की, सर्व गृहकर्ज दर एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटशी जोडलेले आहेत.
गृहकर्जासंबंधीचे व्याज दर
- होम लोन 7.50 ते 8.50 टक्के
- होम लोन 7.75 ते 8.95 टक्के
- टॉप अप लोन 8.00 ते 10.75 टक्के
- टॉप अप लोन 8.25 ते 9.45 टक्के
- मालमत्तेवरील लोन 9.20 ते 10.75 टक्के
- रिव्हर्स मॉर्गेज लोन 10.55 टक्के
- योनो टॉप अप लोन 8.35 टक्के
ईएमआय किती वाढणार
जर 20 वर्षांच्या काळासाठी 30 लाख रुपयांच्या कर्जावर 8.45 टक्के दराने 25 हजार 830 रुपयांचा ईएमआय भरावा लागत होता. तर नवीन 8.70 टक्के दराने हा ईएमआय 26 हजार 278 रुपयांपर्यंत जाईल. म्हणजेच दर महिन्याला कर्जदाराला 450 रुपये जास्त ईएमआय भरावा लागेल. 50 लाख किंवा त्याहून अधिक मोठे कर्ज घेणाऱया कर्जदारांना आणखी जास्त ईएमआय भरावा लागू शकतो. एसबीआयच्या या निर्णयामुळे नवीन घर घेणाऱयांना घर चांगलेच महागात पडू शकते.