दशावतार, गोविंदांचे विक्रमामागून विक्रम; घाटकोपर, ठाणे येथे जय जवानने दाखवला दस का दम

‘ढोलताशा, डीजेचा दणदणाट, बोल बजरंग बली की जयचा घोष… गोविंदा रे गोपाळा’चा टिपेला पोहोचलेला सूर आणि श्वास रोखून धरायला लावणाऱया दहा थरांच्या ‘विश्वविक्रमी’ मनोऱयांमुळे मुंबईसह राज्यभरात गोविंदांचा ‘दशावतार’च दिसून आला. जोगेश्वरीच्या कोकण नगर मंडळ गोविंदा पथकाने ठाण्यात कमाल दाखवत दहा थर लावून विश्वविक्रम केला. त्यापाठोपाठ जोगेश्वरीच्याच जय जवान गोविंदा पथकानेही घाटकोपर आणि ठाण्यामध्ये ‘दस का दम’ दाखवत दोन वेळा 10 थर रचून वर्ल्ड रेकॉर्ड केल्याने महाराष्ट्राची दहीहंडी आणि गोविंदा पथकांचे नाव जगाच्या पाठीवर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.

मुंबईत सकाळपासूनच गोविंदा मटकी फोडण्यासाठी सज्ज होऊन निघाले. यामध्ये लहानग्यांसह तरुणींचाही मोठा सहभाग होता. तरुणांच्या बरोबरीने महिला आणि लहानगे मोठ्या हिमतीने थरावर थर लावत होते. अनेक मंडळांनी पाच थरांपासून थेट नवव्या थरांपर्यंत जात सलामी दिली. चांद्यापासून बांद्यापर्यंत रंगलेल्या या उत्सवाने डोळय़ांचे पारणे फेडणाऱया संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडले.