महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

एनडीएने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याबाबत माहिती दिली.

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे या पदासाठी निवडणूक होत आहे. इंडिया आघाडीनेदेखील या निवडणुकीत उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत. सत्ताधारी व विरोधी गोटांत गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरू होती. सत्ताधारी एनडीएने राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आता इंडिया आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

राधाकृष्णन हे गेल्या चार दशकांपासून सार्वजनिक जीवनात सक्रिय असून ते दोन वेळा कोइम्बतूरमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. तामीळनाडू भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मागील अडीच वर्षांपासून ते राज्यपालपदी आहेत. सुरुवातीला त्यांची नियुक्ती झारखंडच्या राज्यपालपदी झाली होती. तेलंगणा व पुद्दुचेरीच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता.

राजनाथ यांचा खरगेंना फोन

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्हाला विरोधकांच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहोत. सर्व विरोधकांशी चर्चा केली जाईल, असे जेपी नड्डा म्हणाले. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करून पाठिंबा मागितला.