
हिंदुस्थानी फुटबॉलमध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मोहन बागान क्लबने हिंदुस्थानच्या वरिष्ठ फुटबॉल संघाच्या शिबिरासाठी आपले खेळाडू पाठवण्यास स्पष्ट शब्दांत नकार कळवला आहे. आगामी सीएएफए नेशन्स कपसाठी 15 ऑगस्टपासून बंगळुरूत शिबिराला सुरुवात झाली असली तरी अद्याप 13 खेळाडू शिबिरात सहभागी झालेले नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ज्यात सात खेळाडू एकटय़ा मोहन बागान क्लबचे आहेत.
इंडियन सुपर लीग (आयएसएल) विजेता मोहन बागानने सोमवारी स्पष्टपणे जाहीर केले की, फिफा विंडोबाहेर खेळाडूंना सोडणे बंधनकारक नाही आणि त्यांनी हिंदुस्थानी फुटबॉल महासंघावर खेळाडूंच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिबीराला नकार कळवला आहे.आधी मोहन बागानच्या खेळाडूंची अनुपस्थिती डयुरंड कपमुळे असल्याचे सांगितले जात होते. मात्र, इस्ट बंगालविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत 1-2 पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडूनही क्लबने खेळाडू न सोडण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. कारण म्हणून 16 सप्टेंबरला सॉल्ट लेक स्टेडियमवर तुर्पमेनिस्तानच्या आहल फुटबॉल क्लबविरुद्ध होणाऱया एएफसी चॅम्पियन्स लीग टू सामन्याचा दाखला देत त्यांनी खेळाडू न खेळण्यास बंधने घातली आहेत. मोहन बागानच्या अधिकाऱयांनी राष्ट्रीय महासंघावर टीका करताना संघाचा कर्णधार सुभाशीष बोसचा उल्लेख केला. बोस मार्चमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या आशियाई कप पात्रता सामन्यात जखमी झाला होता आणि तेव्हापासून तो खेळापासून दूर आहे. मात्र त्याची साधी विचारपूसही करण्यात आली नाही. दरवेळी आमचे तीन-चार खेळाडू जखमी होऊन परततात आणि महासंघाला त्यांची जराही पर्वा नसते. मोबदला नाही, विचारपूस नाही. बोस संपूर्ण हंगामाला मुकला, त्याला पगार आम्ही देतो, पण महासंघाने एक फोनही केला नसल्याची खंत मोहन बागानच्या अधिकाऱ्याने बोलून दाखवली.




























































