जर्मनीला जाणाऱ्या ‘बोईंग 757’ विमानाला आग; 300 प्रवाशांचा जीव टांगणीला, इटलीत इमर्जन्सी लँडिंग

ग्रीसच्या कॉर्फू येथून जर्मनीच्या दिशेने उड्डाण घेतलेल्या काँडोर (Condor) एअरलाईन्सच्या बोइंग 757-300 विमानाला हजारो फुटांवर असताना आग लागली. यामुळे विमानातील 300 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. विमानाच्या पायलटने प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि विमानाचे इटली येथे इमर्जन्सी लँडिंग केले. यामुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला.

माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, सदर विमानाने शनिवारी रात्री 263 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्ससह उड्डाण घेतले होते. हे विमान जर्मनीच्या डसेलडॉर्फकडे जात असताना अचानक विमानाला आग लागली. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच उजव्या इंजिनातून जोराचे आवाज येऊ लागले आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 18 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये विमानाच्या उजव्या बाजूने ठिणग्या आणि ज्वाळा बाहेर पडताना दिसत आहेत. तर अन्य एका व्हिडिओत विमान पक्ष्यांच्या झुंडीतून जात असल्याचे दिसते. इंजिनला आग लागल्याचे कळताच पायलटने आपत्कालीन संदेश देऊन खराब झालेले इंजिन बंद केले आणि एका इंजिनाच्या मदतीने इटलीच्या ब्रिंडिसी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.

दरम्यान, इमर्जन्सी लँडिंगनंतर प्रवाशांना हॉटेल्समध्ये जागा न मिळाल्याने रात्री विमानतळावरच थांबावे लागले. एअरलाइन्सकडून त्यांना ब्लँकेट्स, व्हाउचर्स आणि सुविधा पुरवल्या गेल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरे विमान पाठवून सर्व प्रवाशांना डसेलडॉर्फला सुरक्षित पोहोचवण्यात आले. प्रवाशांना झालेल्या मनस्तापाबद्दल काँडोर (Condor) एअरलाईन्सने दिलगिरी व्यक्त करत इंजिनला आग लागल्याच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.