कोलकाताला जाणाऱ्या अलायन्स एअरच्या विमानाचं गुवाहाटी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांमध्ये घबराट

गुवाहाटीहून कोलकाताकडे जाणाऱ्या अलायन्स एअरच्या विमानचे बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. उड्डाणानंतर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान पुन्हा माघारी वळवण्यात आले आणि गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उरवण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

अलायन्स एअरच्या फ्लाइट क्रमांक 9I756 विमानाने दुपारी 1 वाजून 9 मिनिटांनी गुवाहाटीहून कोलकाताच्या दिशेने उड्डाण केले होते. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे संदेश पायलटने दिला. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार विमान तात्काळ माघारी वळण्यात आले आणि दुपारी 2 वाजून 27 मिनिटांनी विमानाचे गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित आहेत. टर्मिनल कर्मचाऱ्यांनी प्रवासी आणि क्रू सदस्यांची आवश्यक ती मदत केली. तसेच प्रवाशांच्या पर्यायी प्रवासाची व्यवस्था अलायन्स एअरने केली. या घटनेमुळे विमानतळावरील नियमित उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाही.

अलायन्स एअरने देखील याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. तांत्रिक समस्येमुळे गुवाहाटी-कोलकार्ता मार्गावरील विमानाला गुवाहाटीला परत आणण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने आणि प्रोटोकॉलचे पालन करत विमानाने सुरक्षित लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या उतरवण्यात आले असून आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली असून तांत्रिक बिघाडाचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केल्याचे अलायन्स एअरने निवेदनात म्हटले.

इंडिगो विमानाचे शेपूट धावपट्टीला घासले; मुंबईत मोठी दुर्घटना टळली