
टॅक्सी आणि बाईकची सेवा पुरवणारी राईड हेलिंग कंपनी रॅपिडोला खोटी आणि दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ने तब्बल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिशाभूल करणारी जाहिरात काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. ज्या लोकांनी पैसे भरले आहेत त्यांना पैसे परत करण्याचे निर्देशही रॅपिडोला देण्यात आले आहेत.
रॅपिडोने केलेल्या जाहिरातीनुसार, रॅपिडोची सेवा अवघ्या पाच मिनिटांत मिळेल. केवळ पाच मिनिटांत ऑटो मिळेल. जर पाच मिनिटांत मिळाले नाही तर 50 रुपये कॅशबॅक मिळेल, परंतु या जाहिरातीमध्ये जे दावे करण्यात आले ते खरे ठरले नाहीत. गेल्या दोन वर्षांत जवळपास 1 हजार 800 ग्राहकांनी या जाहिरातीवर आक्षेप घेत तक्रारी केल्या. रॅपिडोने जाहिरातीत जे दावे केले त्याचे आश्वासन पूर्ण केले नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
रॅपिडोने देशभरातील 120 शहरांमध्ये 548 दिवस वेगवेगळ्या भाषांमध्ये या जाहिराती चालवल्या. या जाहिरातींनी ग्राहकांची दिशाभूल करण्याचे काम केले. रॅपिडोने दिलेला 50 रुपयांचा कॅशबॅक रोख स्वरूपात देण्यात आला नाही. त्याऐवजी कंपनीने ‘रॅपिडो कॉइन्स’ दिले, जे फक्त बाईक राईडसाठी वापरता येत होते. ते फक्त 7 दिवसांसाठी वैध होते आणि त्यात अनेक अटी होत्या. यामुळे त्यांचे मूल्य कमी झाले. सीसीपीएच्या माहितीनुसार असे करून रॅपिडोने चुकीच्या अटींसह ग्राहकांना त्यांची सेवा वारंवार वापरण्यास भाग पाडले, हे अत्यंत चुकीचे होते.
एप्रिल 2023 ते मे 2024 दरम्यान राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर रॅपिडोविरुद्ध 575 ग्राहकांकडून तक्रारी नोंदवण्यात आल्या. तसेच जून 2024 ते जुलै 2025 दरम्यान 1 हजार 224 अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या. या तक्रारींमध्ये जास्त शुल्क आकारणे, परतफेडीत विलंब, ड्रायव्हरचे गैरवर्तन आणि कंपनीकडून कॅशबॅकचे वचन पूर्ण न करणे यांचा समावेश होता.
रॅपिडोने केलेल्या दाव्यानुसार, अवघ्या पाच मिनिटांत ऑटो किंवा 50 रुपये कॅशबॅक अशी खोटी आश्वासने दिली, परंतु ती प्रत्यक्षात लागू करण्यात आली नाही. ग्राहकांना संपूर्ण अटी किंवा शर्ती सांगितल्या नाहीत. त्यामुळे अनेक ग्राहक खोट्या जाहिरातीला फसले. दिशाभूल करणाऱ्या ऑफर्स दाखवण्यात आल्या.