
शुभांशु शुक्ला यांनी ऑक्सिओम-4 मोहिमेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. या मोहिमेत ते मिशन पायलट म्हणून सहभागी झाले होते. दिल्लीत आयोजित इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शुक्ला यांनी अंतराळ मोहिमेचा अनुभव कथन केला. ‘ही संपूर्ण राष्ट्राची मोहीम होती. अंतराळात जाण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. हिंदुस्थान आजही अंतराळातून ‘सारे जहां से अच्छा दिसतो’ असे ते म्हणाले.
लवकरच आपण आपल्या स्वतःच्या कॅप्सूल, आपल्या स्वतःचे रॉकेट आणि आपल्या भूमीवरून एखाद्याला अंतराळात पाठवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘माझी भूमिका मिशन पायलटची होती. क्रू ड्रगनमध्ये चार जागा असतात. मी कमांडरसोबत काम केले आणि क्रू ड्रगनच्या यंत्रणांशी संवाद साधला. भारतीय संशोधकांनी विकसित केलेले प्रयोग पूर्ण केले आणि स्टेम प्रात्यक्षिके, छायाचित्रे आणि व्हिडिओग्राफी केली,’ असे शुक्ला यांनी सांगितले. अंतराळातील पहिले काही दिवस आव्हानात्मक होते आणि पृथ्वीवर परतल्यानंतर गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेणंही कठीण होतं, असे त्यांनी नमूद केले. गेल्या एका वर्षात मी गोळा केलेली सर्व माहिती आपल्या स्वतःच्या मोहिमांसाठी, गगनयान आणि हिंदुस्थानच्या अंतराळ स्थानकासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2027 साली गगनयान
गगनयान मोहीम ही इस्रोची मानवी अंतराळ मोहीम आहे. याअंतर्गत 2027 मध्ये हवाई दलाचे तीन वैमानिक अंतराळयानात पाठवले जातील. हे वैमानिक 400 किमी कक्षेत तीन दिवस राहतील, त्यानंतर हे अंतराळयान हिंद महासागरात उतरवले जाईल. या मोहिमेचा खर्च सुमारे 20,193 कोटी रुपये आहे. सध्या गगनयान मोहिमेसाठी हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी एक ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आहे.