
वरळीमधील लोटस जेट्टी येथे गणपती विसर्जनासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा द्या, अशी मागणी शिवसेनेने पालिकेकडे केली आहे. याबाबत आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी वरळी जेट्टी येथे पालिका-पोलीस अधिकाऱयांसोबत पाहणी केली.
लोटस जेट्टी येथे मोठय़ा प्रमाणात गणपतीच्या मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी पालिकेला यापूर्वीच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनापूर्वी लोटस जेट्टीची डागडुजी करून इतर कामे करण्यात येतील, असे आश्वासन महापालिका अधिकाऱयांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. या वेळी महापालिका जी दक्षिण विभागाचे सहाय्यक अभियंता राजेश यादव, कनिष्ठ अभियंता शिवप्रसाद कोपर्डे, कोस्टल रोड प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता हृषिकेश पाटील, गणेश कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पाटील, ताडदेव पोलीस ठाण्याचे कदम, वरळी वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास शिंगरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.