दाढी वाढवली, ओळख बदलली, तरी पोलिसांनी गाठला; दरोड्यातील फरार आरोपी गजाआड

माटुंगा येथे भररस्त्यात टॅक्सी चालकाला मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीतील फरार मुख्य आरोपीला माटुंगा पोलिसांनी अखेर पकडले. पोलिसांनी ओळखू नये म्हणून आरोपीने मोबाईल फोन बंद ठेवला, दाढी वाढवली, गेटअप बदलला आणि तो उत्तर भारतातील विविध ठिकाणी वास्तव्य करत होता.

बलराम कुमार सिंग व इतर सहकारी हे दादर स्टेशनहून लोअर परळकडे जात असताना दादर पूर्वेकडील रामी हॉटेलसमोर अनोळखी इसमांनी टॅक्सी अडवून त्यांना मारहाण करत 27 लाखांचा ऐवज लुटून नेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर माटुंगा पोलिसांनी तीन दिवसांत सात आरोपींना पकडून रोकड, सोने असा लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत केला. मात्र या गुह्याचा मुख्य आरोपी नीलेश श्रीवास्तव हा फरार होता. त्याने दाढी वाढवली, गेटअप बदलला, मोबाईल नंबर बंद केला आणि ओळख लपवून उत्तर प्रदेशात राहू लागला. माटुंगा पोलिसांनी त्याचा खूप शोध घेतला. पण सापडून येत नव्हता. अखेर पोलीस निरीक्षक केशव वाघ, उपनिरीक्षक संतोष माळी तसेच देवेंद्र बहादुरे, प्रवीण तोडासे, किशोर देशमाने या पथकाने तांत्रिक बाबीच्या आधारे शिताफीने माग काढून नीलेशला पकडले.