
गणेशोत्सवात सामाजिक जनजागृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावण्यासाठी दोन दिवस वाढीव परवानगी द्या, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सध्या चार दिवस असणारी परवानगी विसर्जनाचा दुसरा, पाचवा, सातवा आणि अनंत चतुर्दशी दिवसामध्ये जाते. त्यामुळे सरकारने आणखी दोन दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला वर्षभरात 15 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्रामध्येही असे 15 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी दिले असून चार दिवस गणेशोत्सवासाठी दिले आहेत. तर 9 दिवस इतर उत्सवांसाठी देण्यात आले आहेत.
आवाजाची मर्यादा 55 डेसिबल
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला 15 दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावण्याची परवानगी दिली आहे. या परवानगीमध्ये ध्वनीची मर्यादा दिवसा 55 डेसिबल व रात्री 45 डेसिबलपर्यंत मर्यादित आहे.
पुण्याच्या धर्तीवर मुंबईत परवानगी द्या
राज्याचे सांस्कृतिक मंत्री व मुंबईचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी पुणे जिह्यात सरासरी 7 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांना दिले. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवरच मुंबई शहर व उपनगरासाठी वाढीव दिवस द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गणेशोत्सवासाठी लागणारे पूजा साहित्य किट आणि आरती संग्रह पुस्तिकेचे अनावरण गुरुवारी शिवसेना भवन येथे करण्यात आले. दादर येथील शाखा क्रमांक 192 च्या वतीने स्थानिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माहीम निरीक्षक यशवंत विचले, शाखा समन्वयक रविकांत पडयाची, माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, युवासेना शाखा अधिकारी सुशांत गोजारे, शेखर यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.