चला… गणपतीक कोकणात जावया! आजपासून कोकणात धावणार गणपती स्पेशल ट्रेन

लाडक्या गणरायाचा उत्सव चार दिवसांवर येऊन ठेपल्याने कोकणात जाणाऱया गणेशभक्तांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवारपासून मुंबई, ठाणे, पुण्यातून कोकणात गणपती स्पेशल ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वेने गुरुवारी 14 विशेष गाडय़ांचे 30 ऑगस्टपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करून प्रवासी सेवेसाठी सज्जता दाखवली. रेल्वे स्थानकांवर आता गावी जाणाऱया गणेशभक्तांची गर्दी उसळून ‘बाप्पा मोरया रे’चा गजर घुमणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे परिसरातून लाखो गणेशभक्त कोकणात जाणार आहेत. अनेकांना गणेश चतुर्थीच्या एक-दोन दिवस आधीचे रेल्वे तिकीट मिळालेले नाही. त्यांनी चार दिवस आधीच गाव गाठण्याचे ठरवले. त्या गणेशभक्तांचा प्रवास शुक्रवारपासून सुरू होणार आहे. मध्य रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेन त्यांच्या सेवेत धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ट्रेन क्र. 01167 आणि 01171 या दोन गाडय़ा 22 ते 31 ऑगस्टदरम्यान दररोज लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी स्थानकापर्यंत धावणार आहेत. तसेच 25 ऑगस्टला ट्रेन क्र. 01003 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव, 26 ऑगस्टला ट्रेन क्र. 01129 लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि ट्रेन क्र. 01165 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव या गाडय़ा धावणार आहेत. 27 ऑगस्टला ट्रेन क्र. 01185 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव ही गाडी धावेल. तसेच ट्रेन क्र. 01131 ही गाडी 28 आणि 31 ऑगस्टला लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडीपर्यंत धावणार आहे.

दिवा स्थानकातून ट्रेन क्र. 01155 दिवा ते चिपळूण आणि ट्रेन क्र. 01133 दिवा ते खेड या दोन गाडय़ा 22 ते 31 ऑगस्टदरम्यान दररोज प्रवासी सेवेत असतील. याच कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सावंतवाडीसाठी ट्रेन क्र. 01103 आणि ट्रेन क्र. 01151 या दोन गाडय़ा दररोज सुटणार आहेत, तर रत्नागिरीसाठी ट्रेन क्र. 01153 ही गाडी धावेल. पुण्याहून ट्रेन क्र. 01445 आणि ट्रेन क्र. 01447 या गाडय़ा रत्नागिरीपर्यंत सेवा देणार आहेत.