
सरकारी अनास्थेमुळे मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबी विवंचनेचे दुष्टचक्र लागले आहे. रोजगार हमी योजनेवर काम करूनही फुटकी कवडी मिळत नसल्याने आदिवासींवर अनेकदा उपासमार ओढवते. आदिवासींना जिवंतपणी या यातना भोगाव्या लागत असतानाच नाशेरा ग्रामपंचायतीमधील ठवळपाड्यात सोयीसुविधा सोडाच, पण धड स्मशानभूमीदेखील नाही. त्यामुळे जगताना छळ आणि मरताना यातना अशी भयंकर अवस्था असून त्यांच्या मोक्षाच्या दारावरच समस्यांचा भडाग्नी पेटला आहे.
ठवळपाडा गावात प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. वैद्यकीय सुविधांची वानवा आहे, तर स्मशानभूमी नसल्याने भरपावसात उघड्यावर, कधी प्लास्टिकची ताडपत्री तर पत्र्याचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करून यातना भोगत मोक्ष मिळवावा लागतो आहे. २५ जुलैला कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीत उघड्यावर ताडपत्रीखाली सरण रचून मुसळधार पावसात एका महिलेवर अंत्यसंस्कार करावे लागले. त्यानंतर धामणशेत कोशीमशेत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनाही स्मशानभूमीच्या दुरवस्थेमुळे मरणानंतर यातना भोगाव्या लागत आहेत. त्यापाठोपाठ नाशेरा ग्रामपंचायत हद्दीतील ठवळपाड्यात २० ऑगस्टला सोमी ढोले (८५) या वयोवृद्ध महिलेवर पावसात उघड्यावर पत्र्याखाली चिता रचून अंत्यसंस्कार करावे लागल्याची घटना घडली आहे. अनेक गावपाड्यातील स्मशानभूमींची दुरवस्था झाली असल्याने तेथेही मरणानंतर असाच संघर्ष करावा लागत आहे.
गेल्या चार वर्षांपासून आम्ही स्मशानभूमी बांधण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करत आहे. मात्र त्याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहे. मृतदेहावर पावसात उघड्यावर पत्र्याखाली सरण रचून अंत्यसंस्कार करावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांत सहा मृतदेहांवर असेच अंत्यसंस्कार केले आहेत. मरणानंतरही आदिवासींच्या हालअपेष्टा थांबत नाही हेच आमचे दुर्दैव आहे.
शंकर हाडोंगा, माजी उपसरपंच, नाशेरा ग्रामपंचायत.