जुन्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन महागले

20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण सर्व श्रेणींमध्ये जवळपास दुपटीने महाग झाले आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन नियमामध्ये तिसऱ्यांदा सुधारणा केल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार जुन्या हलक्या मोटार वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क 5 हजारांवरून 10 हजार रुपये झाले आहे.

20 वर्षांपेक्षा जुन्या दुचाकाRसाठी नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण दोन हजार रुपये असेल, तर तीनचाकी आणि क्वाड्रिसायकलच्या नोंदणी नूतनीकरणासाठी 3,500 रुपयांऐवजी पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

अवजड वाहनांमध्ये क्लीनरची गरज नाही

ट्रक, कंटेनर यासारख्या अवजड वाहनांमध्ये ड्रायव्हरसोबत क्लीनर असणे गरजेचे असते. पंक्चर काढणे, गाडी पुढे-मागे घेताना मार्ग दाखवणे, गाडीची स्वच्छता अशी कामे क्लीनरकडून करवून घेतली जातात. परंतु आता अवजड वाहनांमध्ये क्लीनर असणे गरजेचे नाही अशी मसुदा अधिसूचना मोटर वाहन कायद्यान्वये राज्य शासनाने जारी केली आहे. या अधिसूचनेवर 29 ऑगस्टपर्यंत नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.