
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असताना निकृष्ट कामांमुळे रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मुंबईत खड्डा कोणता आणि रस्ता कोणता हेच कळेनासे झाले आहे! पालिकेने जाहीर केलेल्या 1916 या टोल फ्री क्रमांकासह वेबसाईट आणि व्हॉट्सअॅप क्रमांकावर दोन दिवसांत चारशेहून जास्त खड्डय़ांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गासह उपनगरातील अंतर्गत मार्गांचीही अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांसाठी खर्च केलेले करोडो रुपये खड्डय़ात गेले आहेत.
पालकमंत्री म्हणतात, रिकामटेकडे खड्डय़ांविरोधात आंदोलन करतात
‘ज्या लोकांना काही कामधंदा शिल्लक राहिलेला नाही, जे लोक रिकामटेकडे आहेत असेच लोक ख़ड्डय़ांविरोधात आंदोलन करीत आहेत,’ असे वक्तव्य मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा ः फडणवीस
मुंबईच्या रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील सर्व खड्डे बुजवा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईतील खड्डय़ांबाबत फडणवीस यांनी आज मुंबई पालिका आयुक्तांशी चर्चा केली. पावसाची उघडीप मिळाल्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
खड्डय़ांची तक्रार करण्यासाठी सर्व वॉर्डसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक दिले आहेत. या ठिकाणी पह्टो आणि ठिकाणासह खड्डय़ाची तक्रार केल्यास 48 तासांत खड्डा बुजवला जाईल, असे पालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र तक्रार करूनही खड्डे बुजवले जात नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.



























































