
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
मुलांनी सुदृअसावे असे पालकांना वाटत असते मात्र यादृष्टीने पालकांकडून होणारे प्रयत्न योग्य दिशेने आहेत का, हेही पाहायला हवे. सकस आहार जितका महत्त्वाचा तितकेच आहाराच्या सकस सवयीदेखील. मुलांनी तनमनाने सुदृहोण्यासाठी शिस्त, संतुलित आहार आणि योग्य सवयी आवश्यक आहेत. निरोगी पिघडण्यासाठी हे करायलाच हवे.
‘अभ्यास एके अभ्यास’ या एका मानसिक कुपोषणासाठी पालक पाल्यांच्या निरोगी शरीराची आहुती देत आहेत याचे त्यांना भान नाही.अनेक शहरांत, खेडेगावांत मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणे नाहीत हे आपले दुर्दैव आहे! आपल्या पाल्याला योग्य आहार मिळत आहे का, हे पाहण्यासोबतच त्याचे शरीर निरोगी राहील याकडेही पालकांनी लक्ष द्यायला हवे. म्हणूनच लहान मुलांनी एकत्र येऊन खेळणे आवश्यक आहे. खेळ आणि आहार यांचे संतुलन हवेच. शरीरासोबत मनालादेखील योग्य पोषण मिळणे गरजेचे असते. शाळेत अवाजवी शिस्तीचा बडगा आणि शाळा सुटली की, क्लासेसमधील तणावपूर्ण शिक्षण यात गुरफटलेली मुले सुदृढ समाज कसा बनवणार?
मुलांना आहाराबाबत दंडेलशाहीचा वापर करून काहीच फायदा नसतो परंतु काही बाबतीत कडक नियम हवेतच. हे नियम त्यांच्या वर्तमान आणि भविष्यासाठी फायदेशीरच ठरतात. यासाठी घरात एक नियम करा. दिवसभरातील एक तरी जेवण सर्वांनी एकत्र करायचे. एक म्हण आहे, ‘कंपनीचा सीईओ जगात इतर कुठल्याही शिक्षणापेक्षा घरातल्या जेवणाच्या टेबलावर घडतो’.
आपल्या घरात कोणता स्वयंपाक केला जातो याबाबत मुलांना माहिती हवी. यामुळे मुलांना खाण्यात आपोआप रुची निर्माण होते. आज मेन्यू काय हवा? कुठला पदार्थ करू या? याची मोठी चर्चा घडणे हे घरातले वातावरण सुदृढ असण्याचे लक्षण आहे. नाहीतर घरात आई किंवा कामवाल्या बाई काहीतरी जेवण बनवून ठेवणार, मुले यांत्रिकपणे येऊन हवे त्या वेळेला जेवणार ही सोयिस्कर पद्धत हळूहळू समाजाला एकलकोंडे बनवते आहे. तसेच बाबांनीही आईबरोबर एकदा स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करावा, जी मुलांसाठी एक आयुष्यभरासाठी संस्मरणीय घटना होते. बाबा किचनमध्ये काम करत आहेत हे पाहिले की, मुले पण स्वयंपाकघरात घिरटय़ा घालतात, मदत करतात हा स्वानुभव आहे.
सध्याच्या कॉर्पोरेट युगात आईवडील दोघेही कामाला जातात, मुलं घरात अथवा पाळणाघरात वाढतात. कधी कधी आईवडील डाएट करताना रात्रीचे जेवण न करता सॅलड वगैरे काहीतरी खाणेअसे आजचे आयुष्य आहे, पण त्यामुळे घरातील लहान मुले दुरावत जातात, नाहीतर वीकेंडला प्रेम उतू जाऊन त्या प्रेमापोटी पिझ्झा, बर्गर मुलांना खायला घातले जातात. त्याऐवजी हा एक दिवस तरी घरात मिळून मिसळून जेवण करण्यात घालवणे खूप महत्त्वाचे आहे.
टीव्हीसमोर अथवा मोबाइलवर सोशल मीडियावर व्हीडीओ बघत लहान मुलांना भरवणारी आई बघितली की, खरोखरच त्या मुलाची काळजी वाटते. भूक लागली की नाही हे कळत नाही, किती जेवलो हे कळत नाही, जेवणाची चवही कळत नाही. त्यामुळे एकतर वजन वाढायला लागते नाहीतर अपचनाचा त्रास होतो. तेव्हा कितीही आदळआपट, त्रास झाला तरी चालेल, पण जेवताना टीव्ही, मोबाइल बघून जेवण देऊ नका.
घरात आजीआजोबा असतील तर चांगलं आहे, पण त्यांच्या हेल्थ डाएटबरोबरच मुलांच्या चवीनुसार जेवण करणे महत्त्वाचे असते. अन्यथा बाहेर खाण्याची चटक मुलांना लागलेली अनेक उदाहरणे माझ्या समोर आहेत.
प्रत्येक समारंभ हा केक, पेस्ट्री, चॉकलेट, आइक्रीम खाऊन साजरा केला पाहिजे असा काही नियम नाही. ते अतिशय निकृष्ट दर्जाच्या फेसापासून बनवलेले केक, त्यावर रासायनिक रंग असं लहान मुलांना विष खायला घालणं गरजेचं आहे का? त्याला पर्याय म्हणून कित्येक घरी बनवता येतील असे उत्तम पदार्थ आहेत. त्यांचा वापर करावा.
हे सर्व अवघड, पण असंभव नसल्याने मुलांच्या भल्यासाठी पालकांनी करणे आवश्यक आहे. त्यांनी सुरूवात केल्यास मुलं छान अनुकरण करतील हे नक्की. शक्यतो आहाराच्या कल्पना सोशल मीडियावर येणाऱया दोन मिनिटांच्या क्लिपवर ठरवू नका. प्रचंड गोंधळ निर्माण होईल. योग्य पुस्तकांचे वाचन, तज्ञांचा सल्ला घ्याल तर परिणाम अधिक चांगले होतील.