
धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना आणि वारणा धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला. दोन दिवसांपासून पुराच्या संकटात अडकलेल्या सांगली जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. महापुराचा धोका अखेर टळला. शुक्रवारी सकाळपासून पाणी उतरण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. 43.10 फुटांपर्यंत पोहोचलेली पाणीपातळी आज सायंकाळपर्यंत 40 फुटांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला.
कोयना धरणातून रात्रीपासून विसर्ग कमी करण्यात आला आहे. तर, चांदोली (वारणा) धरणातूनही पाणी सोडण्याचे बंद करण्यात आले. केवळ विद्युतगृहातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी गुरुवारी रात्री उशिरापासून ओसरण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला एक-दोन इंचांनी पाणीपातळी कमी होताना दिसत होती. आज शुक्रवारी सकाळपासून दर अर्ध्या तासानंतर चार ते पाच इंचाने पाणीपातळी कमी होताना दिसत आहे. नदीचे पाणी ओसरायला सुरुवात झाल्याने सांगलीच्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
कोयना धरणक्षेत्रात दिवसभरात शुक्रवारी तुरळक पाऊस झाला. कोयना धरणात 99 टीएमसी पाणीसाठा आहे. पाऊस कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने गुरुवारी रात्रीपासून विसर्ग कमी करण्यास सुरुवात केली. धरणक्षेत्रात आणि सांगली, सातारा परिसरातील पावसाने उसंत घेतल्याने पाणीपातळी हळूहळू कमी होत आहे. सांगलीत मागील तीन दिवसांपासून पुराच्या संकटाशी सामना करणाऱ्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला.
दरम्यान, आमदार सुधीर गाडगीळ यांनी सरकारी घाट, आयर्विन पूल येथे पाणीपातळीची पाहणी केली. तसेच, महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत पूरग्रस्तांच्या निवासाची आणि भोजन व्यवस्थेची पाहणी केली.
अडीच हजार नागरिकांचे स्थलांतर
पुरामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील 2 हजार 313 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने 169 कुटुंबांतील 830 जणांचे स्थलांतर केले आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील 84 गावांना पुराचा फटका बसला आहे. 286 कुटुंबांतील दीड हजारांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. याशिवाय गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, असे अकराशे पशुधन सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
पूल, रस्ते पाण्याखाली कायम
कृष्णा, वारणेवरील पाण्याखाली गेलेले पूल, रस्ते सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिले. पुलावरील थोडेफार पाणी कमी झाले असले, तरी वाहतुकीस अद्यापि या पुलावरून परवानगी देण्यात आलेली नाही. शिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदे-मांगले, वारणा नदीवरील चरण-कोडोली, आरळा-शित्तर, बिळाशी-भेडसगाव, कांदे-सावर्डे, पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव-नदि, घोगाव-दुधोंडी, नागठाणे बंधारा, आमणापूर, भिलवडी पूल पाण्याखाली आहेत. याशिवाय 38 रस्ते पाण्याखाली असल्याने वाहतूक बंदच राहिली.