इकोभान – चिंताजनक ‘ड्राय स्पेल’!

>> भावेश ब्राह्मणकर

गेली अडीच महिने कोरडेठाक असलेले अनेक जिल्हे आता तुफान वृष्टीने बेजार झाले आहेत. हे असे वारंवार घडते आहे. शास्त्राrय भाषेतील हा ‘ड्राय स्पेल’ अर्थ व समाजकारणावर विपरीत परिणाम करत आहे. म्हणूनच तो सर्वाधिक चिंतेचा आहे.

राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र या साऱ्यामध्ये एक बाब प्रकर्षाने दुर्लक्षित राहत आहे. त्यावर अधिक प्रकाश टाकणे गरजेचे आहे. जून आणि जुलै हे संपूर्ण, तर अर्धा ऑगस्ट असे एकूण अडीच महिने निम्मा महाराष्ट्र पावसाच्या प्रतीक्षेत होता. लागवड केलेली आणि हातची पिके पाण्याअभावी जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, पण अचानक पावसाची कृपा झाली. पाहता पाहता पावसाने तुफान बॅटिंग सुरू केली. ज्या पिकांना पाऊस हवा होता त्यांना आता तो एवढा मिळाला आहे की, त्यांनी थेट मानच टाकली आहे. म्हणजेच आधी पावसाअभावी आणि आता पावसामुळे उभी पिके वाया जाण्याची वेळ आली आहे. सुक्या-ओल्या दुष्काळाचा हा फेरा अतिशय गंभीर आहे. मान्सून कुठे आणि कसा बरसेल हे कुणाच्या हातात नसले तरी त्यातील हा बदल चिंता करायला लावणाराच आहे.

‘मान्सून हा भारताचा अर्थमंत्री आहे’ असे म्हणतात. कारण भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील जवळपास 70 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. मान्सूनमुळेच शेतीला पाणी लाभते. मान्सून चांगला राहिला तर कृषीशिवाय अन्य क्षेत्रही भरभराटीला असतात. अशा या मान्सूनचे भारतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात हा मान्सून भारतीय महासागरात अंदमान-निकोबारकडून येतो. केरळमधून भारतात प्रवेश करतो. त्यानंतर तो हळूहळू वर उत्तरेकडे सरकत जातो. पाहता पाहता संपूर्ण देश व्यापतो. सगळीकडे कसे चैतन्यमयी वातावरण तयार झालेले असते. धरणी तृषार्त होते. शेतीला पाणी मिळते. धरणे, बंधारे, तलाव ओसंडून वाहतात. पिण्याच्या पाण्याची चिंता मिटते. ऑक्टोबरच्या दरम्यान परतीचा पाऊस सुरू होतो. मान्सूनचे वारे उत्तर आणि ईशान्येकडून पुन्हा दक्षिणकडे कूच करतात. पुन्हा आबादानी होते. यामुळे आगामी वर्ष सुखेनैव जाते. हा प्रघात अनादी काळापासून सुरू आहे, परंतु जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात लक्षणीय बदल होत आहेत. त्यामुळे मान्सून अधिकच लहरी बनला आहे.

भारतीय उपखंडाला मान्सूनचे वरदान आहे. भारतीय महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक समुद्र आदींमधील पाण्याची वाफ सूर्याच्या उष्णतेमुळे होते. हेच वाफेचे ढग मान्सूनच्या रूपाने भारतावर वृष्टी करतात. मात्र जागतिक उष्मा वृद्धीमुळे महासागर आणि समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत आहे. त्याचा परिणाम बाष्पीभवनावरही होत आहे. तसेच हवामान बदलामुळे पीवादळ आणि कमी दाबाचे पट्टे तयार होण्याचे कार्य विस्कळीत तसेच वारंवारही होत आहे. याचा थेट फटका मान्सूनला बसतो आहे. गेल्या शंभर-दीडशे वर्षांतील मान्सूनच्या बदलांचा अभ्यास करता त्यात लक्षणीय निरीक्षणे दिसून येत आहेत. पुण्यात उष्णप्रदेशीय हवामान संस्थेचा (आयआयटीएम) मान्सूनवरील अभ्यास ते दर्शवतो आहे.

‘उष्णप्रदेशी देशांमधील हवामानाचा अभ्यास करणारी स्वतंत्र संस्था असणे आवश्यक आहे,’ असे जागतिक हवामान संघटनेने तिसऱया जागतिक काँग्रेसमध्ये सांगितले. त्याची दखल घेत फेब्रुवारी 1962 मध्ये भारताने आयआयटीएमच्या स्थापनेची घोषणा केली. 17 नोव्हेंबर 1962 रोजी तिची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुण्यातील हवामान विभागाच्या आवारात तिचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर केंद्र सरकारने नेमलेल्या समितीच्या शिफारशीनंतर आयआयटीएमला हवामान विभागाशी संलग्न न ठेवता 1 एप्रिल 1971 मध्ये स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिला. त्या वेळी ही संस्था केंद्रीय पर्यटन आणि हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करीत होती. त्यानंतर 1985 मध्ये आयआयटीएमला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत आणले गेले. संस्थेच्या कार्याचा व्याप आणि महत्त्व लक्षात घेऊन पाषाण येथे काही टप्प्यांमध्ये संस्थेसाठी भव्य इमारत आणि परिसर विकसित करण्यात आला. 1982 मध्ये प्रथम या ठिकाणी संस्था स्थलांतरित झाली. संस्थेचे कार्य हवामानाशी अधिक निगडित असल्याने 12 जुलै 2006 मध्ये केंद्र सरकारने संस्थेला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित आणले. या संस्थेतील हवामान शास्त्रज्ञ मान्सूनची निर्मिती, आगमन, प्रभाव, बदल, गमन आदींवर सखोल अभ्यास करीत आहेत. याच संस्थेने काही अहवालही प्रसिद्ध केले आहेत. त्यात अनेक बाबी स्पष्ट होत आहेत.
संस्थेच्याच एका शोधनिबंधानुसार, दोन पावसांमधील खंड (ड्राय स्पेल) हा अधिक चिंतेचा विषय आहे. म्हणजेच 1 जून रोजी मराठवाडा भागात पाऊस पडला तर थेट 31 जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस पडतो. हे केवळ एवढय़ापुरता सीमित नाही. समजा जालना जिह्याचे जून महिन्याचे पर्जन्यमान आहे 300 मिलीमीटर, तर जूनच्या पहिल्या आठवडय़ातच 300 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. नंतर 30 ते 40 किंवा 60 दिवस एक थेंबही पाऊस पडत नाही. जरी पडला तरी तो तुरळक असतो. त्यानंतर जेव्हा पाऊस पडतो तोसुद्धा संपूर्ण महिन्याचा एकाच दिवशी किंवा ठरावीक दोन-तीन दिवसांत कोसळतो. हे असे घडण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. यामुळे शेतपिकांना मोठा फटका बसतो आहे. शेतकरी आणि शेती दोन्ही अडचणीत येत आहेत.

मान्सूनचा लहरीपणा थांबवायचा असेल तर वनीकरण, वृक्षराजी वाढली पाहिजे. विशेष म्हणजे, जी आहे ती घटते आहे. रस्ते, धरणे, महामार्ग, उद्योग, खाणी आदी विकास किंवा पायाभूत कामांसाठी झाडे तोडली जात आहेत. त्यातुलनेत झाडे लावण्याचे आणि ती जगण्याचे प्रमाण नगण्य आहे. ओसाड आणि बोडक्या प्रदेशावर पाऊस रुसतो. शिवाय हवामान बदलाच्या जागतिक समस्येमुळे पाऊस बेभान झाला आहे. यासाठी आयआयटीएम संस्थेला अधिक बळ दिले पाहिजे. तेथील शास्त्रज्ञांना अधिकाधिक संशोधन करण्यास सांगितले पाहिजे. त्यांच्या अहवालांनुसार उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात हे सारे तितके गांभीर्याने होत नसल्याने मान्सूनचा बेदरकारपणा वाढतच आहे. या साऱयात शेतकरी सर्वप्रथम नुकसान सहन करीत आहेत, पण त्याचे धक्के सर्वांनाच थोडय़ा अधिक प्रमाणात बसत आहेत. वेळीच शहाणे आणि उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा आपल्या हाती काहीच नसेल.

(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत.)