
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे आता तिकीट असणे आवश्यक आहे. सणासुदीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने एक निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाशाकडे रेल्वेचे तिकीट नसेल अशा प्रवाशांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश मिळणार नाही. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर हा नियम लागू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. याची चाचणी एक महिना चालणार आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर त्याची देशभरात अंमलबजावणी केली जाऊ शकते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये नवी दिल्ली स्टेशनवर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली होती.
आता सणासुदीत पुन्हा एकदा प्रवाशांची गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वेने हा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. याआधी रेल्वेने अनारक्षित कोचसाठी केवळ 150 तिकीट जारी केले होते. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवता आले होते. एका कोचची प्रवासी क्षमता 80 प्रवाशांची असते. त्यात 300 ते 400 प्रवासी घुसतात. यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडू शकते. नव्या योजनेनुसार, स्टेशनपासून प्रत्येक अनारक्षित कोचसाठी केवळ 150 तिकिटे जारी केली जातील.