
जयपूर येथील डोल का बाध या 100 एकर जंगलात विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड होत आहे. याविरोधात स्थानिक नागरिक अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या दोन चिमुरड्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. 13 वर्षीय सावी शेखावत आणि तिची सात वर्षांची बहीण भव्या गुरुवारी जयपूरहून दिल्लीला पोहोचल्या. दोघींनी 12 दिवसांत सुमारे 300 किलोमीटर सायकल चालवून हा प्रवास केला.
डोल का बाध जंगलातील वृक्षतोड आणि हरित भाग नष्ट होत आहे. विकास प्रकल्पांसाठी शहरी जंगल साफ केले जात आहे. याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सावी आणि भव्या यांनी 11 ऑगस्ट रोजी जयपूरच्या तारुछाया नगर येथून सायकलवरून आपला प्रवास सुरू केला. त्यांनी दररोज सुमारे 35 किमी अंतर कापले. वाटेत त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींनी आपली सायकल सफर सुरू ठेवली. ही सफर 2021 पासून सुरू असलेल्या ‘सेव्ह डोल का बध’ मोहिमेचा भाग आहे. भेटीची वेळ घेतली नसल्याने दोघींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटता आले नाही.
‘सेव्ह डोल का बाध’ मोहीम
जयपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डोल का बाधमध्ये 2,400 हून अधिक स्थानिक झाडे, 85 प्रजातींचे पक्षी आणि नीलगाय आणि ससे यांसारखे प्राणी आहेत. अनेक नागरिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या विरोधाला न जुमानता, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी एक प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे. यामध्ये जंगलाच्या जागी युनिटी मॉल व इमारती उभ्या राहणार आहेत. त्यासाठी तब्बल अडीच हजार झाडे तोडली जाणार आहेत, अशा ‘सेव्ह डोल का बाध’ मोहिमेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.