
ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेला 35 लाख रुपयांची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिला जिवंत जाळून तिची हत्या करण्यात आली. महिलेच्या कुटुंबाने तिचा पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप करत न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्व पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निक्की असे या मृत महिलेचे नाव आहे. निक्कीचे डिसेंबर2016 मध्ये विपिन नावाच्या एका व्यक्तीशी लग्न झाले. यावेळी निक्कीच्या कुटुंबाने लग्नात स्कॉर्पिओ कारसह अनेक गोष्टी दिल्या होत्या, नंतर दुसरी कार देखील देण्यात आली. तरीही, पती आणि सासरच्यांनी 35 लाख रुपयांची मागणी केली. मात्र निक्कीच्या कुटुंबाला एवढे पैसे देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा निक्कीचा सतत छळ केला जात असे.
पीडितेची बहीण कांचन, जिचे लग्न निक्कीचा मेहुणा रोहितशी झाले होते. दरम्यान कांचनने सांगितले की, 21ऑगस्ट रोजी विपिन आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी निक्कीला बेदम मारहाण केली. गळा दाबल्यानंतर ती बेशुद्ध पडली तेव्हा तिच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला जाळून टाकण्यात आले. त्यामुळे तिची खूप गंभीर अवस्था झाली होती. याच अवस्थेत तिला जवळच्या रुग्णालयात नेलं आणि नंतर दिल्लीतील एका रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, असे कांचनने सांगितले. या वेदनादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
निक्की आणि तिची बहीण कांचन यांना लग्नापासूनच सासरच्या घरात छळ सहन करावा लागत होता. अनेक वेळा पंचायत बोलावण्यात आली आणि तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सासरच्यांनी हुंड्याची मागणी सोडण्यास नकार दिला, असे मृत महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले.
या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. कसना पोलिस ठाण्यात पती विपिन, मेहुणा रोहित, सासू दया आणि सासरे सतवीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ग्रेटर नोएडाचे एडीसीपी सुधीर म्हणाले.