
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस जनावरांना लम्पी त्वचारोगाचा फैलाव वाढू लागला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पीबाधित जनावरांवर योग्य तो उपचार केला जात आहे. आतापर्यंत जिह्यातील 89 जनाकरांचा मृत्यू लम्पी त्वचारोगाने झाला असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली.
सातारा जिह्यात मे महिन्यापासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे जनावरांच्या लम्पी त्वचारोगाने डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने सातारा जिह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवली. ज्या ज्या ठिकाणी लसीकरणात जी जनावरे चुकली आहेत, त्या ठिकाणी पुन्हा प्राधान्याने लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
लम्पी त्वचारोग डास, माशासारख्या किटकाद्वारे पसरत आहे. संक्रमित जनावराच्या संपर्कातून किंवा दूषित वस्तूंच्या माध्यमातूनही हा रोग पसरू शकतो. जनावरांना जास्त ताप येतो. त्वचेकर गाठी येतात. विशेषतः डोके, मान, पाय, जननेंद्रिय आणि पायांना सूज येते तसेच जनावर लंगडते, काहीकेळा डोळे व नाकातून स्राव पसरतो, ही लम्पी त्वचारोगाची लक्षणे आहेत.
सातारा जिह्यात जावली 14, कराड 126, खंडाळा 19, खटाव 154, कोरेगाव 251, माण 248, पाटण 49, फलटण 42, सातारा 596 असे मिळून 1 हजार 499 जनावरे लम्पी त्वचारोगाने बाधित आहेत. त्यापैकी 1 हजार 93 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. सध्या 317 जनावरांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिह्यात जावली 2, कराड 7, खटाव 7, कोरेगाव 13, माण 13, पाटण 2, फलटण 4, सातारा 41 असे मिळून 89 जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली.
लम्पीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागामार्फत बाधित झालेल्या जनावरांवर योग्य औषधोपचार करण्यात येत आहेत, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी सांगितले.
पशुपालकांनी अशी घ्यावी काळजी
पशुपालकांनी जनावरांची आवश्यक ती काळजी घ्यावी. रोगाची लक्षणे आढळल्याबरोबर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच जनावरांची तपासणी करून घ्यावी. गोठय़ात गायी व म्हशींना एकत्रित बांधू नये. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. रोगाचा प्रसार कीटकामार्फत होत असल्यामुळे कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठय़ांची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. परिसरात स्वच्छता राखावी. निर्जंतुक द्रावणाने परिसरात फवारणी करावी. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरता व चारा खाण्यासाठी स्वतंत्र व्यकस्था करावी.