
नवी मुंबई पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचनाही मिंधे गट आणि भाजपच्या मर्जीनुसार झाली आहे. भाजप आणि मिंधे गटाने आपल्या उमेदवारांना फायदा व्हावा यासाठी अनेक एकसंघ भागांची सोयीस्कररीत्या फाळणी केली आहे. जवळचा भाग सोडून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेला भाग काही प्रभागांना जोडला आहे. या प्रभाग रचनेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कडाडून विरोध करण्यात आला आहे.
मिंधे आणि भाजपने महापालिकेवर प्रचंड दबाव टाकून पालिका निवडणुकीची प्रभाग रचना आपल्या मर्जीनुसार करून घेतली आहे. ही प्रभाग रचना करताना भौगोलिक एकसंघता आणि नैसर्गिक सीमा पाळणे आवश्यक होते. मात्र एकसंघ असलेल्या सीवूड परिसराची फाळणी करण्यात आली आहे. सीवूडचे सेक्टर 40 आणि 42 हे नेरुळला जोडण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 25, 24 आणि 26 मध्ये अधिसूचना आणि नकाशे हे एकमेकांशी विसंगत आहेत. या प्रभाग रचनेमध्ये नेरुळ गावाचीही फाळणी करण्यात आली आहे, असा आरोप शिवसेना उपशहरप्रमुख समीर बागवान यांनी केला आहे.
सुधारीत प्रभाग रचना तातडीने प्रसिद्ध करा !
महापालिका प्रशासनाने सध्या प्रसिद्ध केलेली प्रारूप प्रभाग रचना ही मिंधे गट आणि भाजपवाल्यांच्या मर्जीनुसार आहे. शिवसेनेचा प्रभाव असलेल्या प्रभागांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रभाग रचना तातडीने रद्द करून सुधारीत प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणीही समीर बागवान यांनी केली आहे.
मंदा म्हात्रे यांनाही फटका
प्रारूप प्रभाग रचनेमध्ये भाजपच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनाही मोठा फटका बसला आहे. त्यांच्या समर्थांच्या प्रभागांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे म्हात्रे यांच्या गोटात नाराजी पसरली आहे. भाजपच्या अंतर्गत असलेले हे नाराजी नाट्य महापालिका निवडणुकीत पुन्हा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.