Ganeshotsav 2025 – चंद्रपुरात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला, प्रशासनही सज्ज

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चंद्रपुरात जोरात सुरू आहे. पावसाने उसंत घेतल्याने मूर्तींची निर्मिती निर्विघ्न पार पडली. यावेळी मागणीनुसार मूर्तिकारांनी मूर्ती तयार केल्या आहेत. सुमारे शंभरावर गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तींची मागणी नोंदवली आहे. शिवाय घरगुती मूर्तींची निर्मितीही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. बाप्पाच्या आगमनाला आता काही तासच शिल्लक असल्याने मंडळांनी सजावटीच्या कामांना वेग दिला आहे.

गणेशोत्सव म्हटलं की लोकं मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. त्यामुळे उत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा म्हणून पोलीस प्रशासनानेही बैठकांचा सपाटा लावला आहे. मंडळांचे पदाधिकारी, डीजे आणि शांतता समितीच्या बैठका पोलीस ठाणेस्तरावर घेतल्या जात आहेत. न्यास नोंदणी कार्यालयानेही मंडळांची नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरू केली असून, आतापर्यंत 25 मंडळांनी त्यात नोंदणी केली. ही नोंदणी येत्या दोन दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. मोठ्या मूर्ती मूर्तिकारांच्या कारखान्यातून मंडपाच्या दिशेने मार्गस्त होतात. तर घरगुती गणपती आणि छोट्या मूर्तींसाठी महापालिकेने चांदा क्लब येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय पारंपरिक बाजार आझाद बगीचालगत भरणार आहे. यावर्षी उत्सवाची मोठी उत्सुकता भक्तांमध्ये दिसून येत आहे. काही मंडळांनी दोन दिवस आधीच बाप्पाची स्थापना केली. यामुळे सजावटीचे कार्य उत्तमरित्या झाले आहे. मूर्तींच्या किमती यावेळी थोड्याफार वाढल्या असल्या तरी उत्साहापुढे त्या नगण्य ठरल्या आहेत.