
देशभरात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. यातच हवामान विभागाने (IMD) देशातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांत हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, प्रयागराज आणि मध्य प्रदेशसह अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनच्या घटना घडल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात ढगफुटी होऊन 4 जणांचा मृत्यू झाला. तर वैष्णो देवी मंदिराजवळ भूस्खलनात अनेक जखमी झाले. दिल्लीतही यमुना नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय हवामान विभागाने राजस्थानसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये पावसाचा थैमान
जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असून, डोडा जिल्ह्यात ढगफुटी होऊन भयंकर पूर आला आहे. यातच गुप्त गंगा मंदिराजवळ अचानक पूर येऊन 10-15 घरे वाहून गेली, तर चिनारवा नाला आणि चिनाब नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा वर गेली आहे. जम्मूमधील गंधीनगर, ऊधमपूर आणि रामबनमध्येही पूरसदृश्परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, हवामान विभगाने देशाच्या अनेक भागांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला असून, हिमाचल, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट आहे. पावसामुळे भूस्खलन, पूर आणि वाहतूक अडथळ्यांची शक्यता आहे. नागरिकांना सावध राहण्याचा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.