
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी एक दिवसाची मुदतवाढही दिली आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण स्थळावरून माध्यमांशी संवाद साधला. मराठा आंदोलकांना अन्न पाणी मिळू नये म्हणून खाऊ गल्ली बंद केल्या. तसेच स्वच्छतागृहेही मिळू नयेत अशी व्यवस्था केली आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. हे सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे. मराठ्यांच्या मुलांना वाईट वागणूक मिळत आहे, अशी सडकून टीकाही जरांगे यांनी महायुती सरकारवर केली.
आम्ही आरक्षणासाठी आंदोलन करतोय. पण या ठिकाणची खाऊ गल्ली, हॉटेल बंद करण्यात आले आहेत. पाण्याची सोय करण्यात आली नाही. आंदोलकांना चहा-पाणी, जेवण मिळू नये म्हणून हे सगळे करण्यात आले. त्यांना स्वच्छतागृहे मिळू नयेत यासाठी प्रयत्न केले. आम्ही सरकारशी सहकार्य केलं, त्यांच्या नियमांचे पालन केले. पण हे सरकार इंग्रजांपेक्षा बेकार आहे. सरकारने आडमुठेपणा केला तर आम्हीही आडमुठेपणा करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आम्ही कधीच असं म्हटलं नाही की, ओबीसींचे काढून घ्या आणि आम्हाला द्या. आमच्या नोंदी या 150 वर्षांपूर्वीच्या आहेत. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटमध्ये तशा नोंदी आहेत. त्यामुळे आम्ही कुणाचंही काढून घेत नाही तर, ते आमच्या हक्काचं आहे. उलट आमच्याच हक्काचं काढून घेऊन इतरांना दिलंय. अशा प्रकारचं वक्तव्य करुन सरकारच मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावत आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. ही लढाई आता आरपारची आहे, मागे हटणार नाही. एकतर सरकारला आरक्षण द्यावं लागेल किंवा उपोषण करून मी तरी मरणार. पण मागे हटणार नाही. आता फक्त आरक्षण घेणार नाही तर, त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला.
जातीजातीत भांडणे लावत महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत; संजय राऊत यांचा घणाघात
“फडणवीसांनी धनगरांना फसवलं”
फडणवीसांनी धनगरांना फसवलं आणि अजून आरक्षण दिलं नाही. कैकाडी समाज हा पश्चिम महाराष्ट्रात अनुसूचित जातीत आहे, मराठवाड्यात ओबीसी आहे. तर इतर ठिकाणी वेगळ्याच प्रवर्गात आहे. कैकाडी समाज एकाच राज्यात तीन प्रवर्गात आहे हे फडणवीसांचं कर्तृत्व. मराठ्याची एक मुलगी ओबीसी आणि दुसरी जनरल प्रवर्गात, हे तुमचं कर्तृत्व. शेतकरी आत्महत्या करतात हे फडणवीसांचा कर्तृत्व, अशी खरमरीत टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.