
जम्मू-कश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबीच्या हॅटट्रिकने दुलीप करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा दिवस गाजवला. नबीने केवळ हॅटट्रिकच घेतली नाही तर शेवटच्या पाच फलंदाजांना गारद करत पूर्व विभागाचा डाव 230 धावांतही गुंडाळला. त्यामुळे उत्तर विभागाला पहिल्या डावात 175 धावांची भक्कम आघाडी मिळाली.
उत्तर विभागाने पहिल्या डावात 405 धावा केल्या होत्या. त्यानंतर पूर्व विभागाच्या डावात विराट सिंगने (69) झुंजार खेळ केला. त्याने कर्णधार रियान पराग (39) सोबत चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली तर कुमार कुशाग्र (29) सोबत पाचव्या विकेटसाठी 74 धावा जोडल्या. त्यावेळी सामना रंगतदार होईल असे वाटत होते, पण 200 धावांवरून पूर्व विभागाचा डाव कोसळला आणि औकिब नबीच्या वेगवान गोलंदाजीसमोर त्यांच्या फलंदाजांनी शस्त्र टाकली.
नबीने आपल्या भेदक माऱयात चार फलंदाजांना सलग चार चेंडूंवर बाद केले. विराट सिंगचा मधला दांडा उखडला, त्यानंतर मनिषी बाद झाला, लगेचच मुख्तार हुसेनला त्रिफळाचीत केले. मग सूरज सिंधू जैस्वाल झेलबाद झाला. पुढच्या षटकात नबीने मोहम्मद शमीला पायचीत पकडत हॅटट्रिक पूर्ण केली. नबीने एकूण 5 विकेट फक्त 28 धावांत घेतले.
गोलंदाजीत चमक दाखवण्याआधी नबीने फलंदाजीतही दम दाखवला होता. नवव्या क्रमांकावर खेळताना त्याने फक्त 33 चेंडूंत 44 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीमुळे उत्तर विभागाने पहिल्या डावात 308/6 वरून 405 अशी मजल मारली.
संक्षिप्त धावसंख्या – उत्तर विभाग – 405 (आयुष बदोनी 63, कन्हैया वाधवान 76, औकिब नबी 44, मनिषी 6/111)
पूर्व विभाग – 230 (विराट सिंग 69, रियान पराग 39, औकिब नबी 5/28).