
हमदपूर तालुक्यातील गोताळा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शंकर बाबुराव माटे (वय – 45) नावाच्या एका तरुणाने गावातील मोबाईल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
शंकर माटे हे टॉवरवर चढलेले पाहून गावकऱ्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांना खाली उतरण्याची अनेकवेळा विनंती केली. मात्र, त्यांनी कोणाचेही न ऐकता टॉवरवरून खाली उडी मारली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शंकर माटे हे मुंबईमध्ये एका बांधकाम बिल्डरकडे सुपरवायझर म्हणून काम करत होते. त्यांना 17 आणि 19 वर्षांचे दोन मुलगे आणि 13 वर्षांची एक मुलगी आहे. तीन ते साडेतीन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर शेतात भुईमूग काढत असताना वीज पडली होती, पण त्यातून ते बचावले होते. आता त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, माटे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. शंकर माटे यांच्या मृतदेहाचे शासकीय ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. सदरील घटनेची अहमदपूर पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.