
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी (वय – 57) टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी अंबाजोगाई येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सुनील नागरगोजे हे मूळचे परळी तालुक्यातील नागदरा येथील होते. परभणी, लातूर, आणि बीड येथे त्यांनी सेवा बजावली होती. अनेक वर्षांच्या सेवेनंतर मागील काही महिन्यांपासून ते कर्तव्यानंतर नव्हते. नुकतेच त्यांनी अंबाजोगाई येथील घर बांधकामासाठी पाडल्याने ते प्रशांत नगर येथे भाड्याने राहत होते. त्या ठिकाणीच त्यांनी सोमवारी रात्री घरात कुणी नसताना सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेनदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. सुनील नागरगोजे यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.