
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात खड्यांमुळे घडलेल्या अपघातात सुमारे ६९ जणांचा बळी गेल्याने हे खड्डे नरभक्षक ठरले आहेत. रस्ते खड्यात गेल्यामुळे भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, मीरा रोड, भाईंदरमध्ये अपघात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
ठाणे जिल्ह्यात विविध मार्गांवर गेल्या दोन वर्षांत खड्ड्यांमुळे शेकडो अपघात घडले आहेत. या अपघातांत मुरबाडमध्ये २५ जणांचा, मीरा-भाईंदरमध्ये ७ जणांचा, भिवंडीत ३५ जणांचा तर उल्हासनगर, नवी मुंबईत प्रत्येकी एकाचा खड्ड्यांनी बळी घेतला आहे. यंदाही बहुतेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. कल्याणच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या गोविंदवाडी बायपास पुलावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून २४ तास वाहनांची वर्दळ असते. या पुलावर पडलेल्या खड्यांमुळे वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे.
मुरबाड तालुक्यात शहापूर-बदलापूर रस्त्याची खड्ड्यांमुळे सध्या चाळण झाली आहे. गणेशोत्सवात हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भरले जातील, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र खड्डे तसेच राहिल्याने गणेशभक्तांसह स्थानिक नागरिकांची निराशा झाली आहे. भिवंडी आणि मीरा-भाईंदरमध्येही खड्यांमुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. नवी मुंबईतील एमआयडीसीमध्ये अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
खालापूरमध्ये रस्त्यांची दुर्दशा
खालापूर तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्ते खड्ड्यात गेल्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या मतदारसंघात तीन हजार कोटी रुपयांची कामे केली असा गाजावाजा केला होता. मात्र हा विकास नेमका कोठे झाला हा आता एक संशोधनाचा विषय झाला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. चिंचवली, लॉजी, मुळगाव, डीपी रोडची अवस्था दयनीय झाल्याने गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.