
सात दिवसांच्या बाप्पांना गौराईसह आज निरोप दिल्यानंतर मुंबईतील मोठे गणपती पाहण्यासाठी आज रात्रीपासून भाविकांची गर्दी उसळली आहे. परळ, लालबाग, गिरगावमध्ये गणेश दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लालबागमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नाही इतकी तुडुंब गर्दी झाली आहे.
लालबाग आणि गिरगावमध्ये उंच गणपती मोठय़ा प्रमाणात आहेत. ते पाहण्यासाठी दरवर्षी भाविकांची प्रचंड गर्दी होते. पाच दिवस आणि सात दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनानंतर ती वाढतच जाते. यंदाही पाच दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनानंतर लोक मोठे गणपती पाहण्यासाठी निघाले. आज गौरी गणपतींच्या विसर्जनानंतर रात्री परळ, लालबाग, गिरगावमधील मंडप भाविकांनी फुलून गेले.
लालबाग आणि परिसरात गणेशगल्ली, लालबागचा राजा, तेज्युकाया, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती, रंगारी बदक चाळ येथील गणपती पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होत आहे. मध्य रेल्वेवरील करीरोड, चिंचपोकळी आणि भायखळा तर पश्चिम रेल्वेवरील लोअर परळ स्थानकात उतरून भाविक लालबागला दर्शनासाठी जात असल्याने या स्थानकांवर लोकलगाडय़ा रिकामी होत आहेत. गणपती बाप्पा मोरया असा गजर करतच भाविक लालबागच्या दिशेने रवाना होत आहेत.
काळजी घ्या; सतर्क राहा
सार्वजनिक गणपतीच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून भाविक येऊ लागले आहेत. त्यामुळे लालबाग-परळसह शहरातील विविध ठिकाणी भक्तांची गर्दी होत असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी, सतर्क राहावे. काही संशयास्पद वाटल्यास 100/112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.




























































