
मुंबई पोलीस अनंत चतुर्दशीच्या बंदोबस्ताच्या तयारीत व्यस्त असतानाच मुंबईला पुन्हा एकदा आत्मघाती हल्ल्याची धमकी मिळाली आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर ही धमकी देण्यात आली. शहरात ठिकठिकाणी 34 वाहनांमध्ये 34 मानवी बॉम्ब पेरले असून 400 किलो आरडीएक्सद्वारे घातपात केला जाईल, असे धमकीच्या संदेशात म्हटले आहे. याची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा तपासाला लागली आहे.
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सर्व सतर्कता बाळगली आहे. पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. असे असतानाच वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर धमकीचा संदेश आल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल 34 गाडय़ांमध्ये 34 मानवी बॉम्ब लावण्यात आले आहेत आणि स्फोटानंतर संपूर्ण मुंबई हादरून जाईल, असे धमकावले आहे.
14 पाकिस्तानी अतिरेकी घुसल्याचा दावा
‘लश्कर-ए-जिहादी’ या संघटनेचे नाव संदेशात असून 14 पाकिस्तानी दहशतवादी हिंदुस्थानात घुसले आहेत, असा दावा धमकीच्या संदेशात करण्यात आला आहे. 400 किलो आरडीएक्सच्या स्फोटामुळे असंख्य नागरिकांचा बळी जाईल असेही नमूद केल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलीस अधिक अलर्ट झाले आहेत.