मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक, सर्व गाड्या एसी; निविदाही काढली

मुंब्रा दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने सुरक्षित लोकल प्रवासासाठी पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक मिळणार आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) मुंबईच्या उपनगरी रेल्वेसाठी 2,856 एसी वंदे मेट्रो कोच खरेदी आणि देखभालीसाठी निविदा काढल्या आहेत. सर्व लोकल ट्रेन वातानुकूलित करण्याच्या दृष्टीने एमआरव्हीसीने या कार्यवाहीला गती दिली आहे.

एमआरव्हीसीने 2,856 एसी वंदे मेट्रो कोच खरेदी आणि देखभालीसाठी निविदा काढल्या आहेत. वंदे मेट्रो डब्यांची ही खरेदी मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवून आणेल. स्वयंचलित दरवाजे, प्रगत तांत्रिक वैशिष्टय़े व जागतिक दर्जाची देखभाल सहाय्य यांसारख्या आधुनिक सुविधांसह लाखो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले. वंदे मेट्रो कोच खरेदीचा करार झाल्यानंतर दोन वर्षांत पहिला प्रोटोटाईप रेक मुंबईत दाखल होईल, असे एमआरव्हीसीने जाहीर केले आहे.