महाराष्ट्र सरकार इलेक्टोरल बाँडच्या देणगीचं ऋण फेडतंय! आमदार रोहित पवार यांचा महसुलमंत्री बावनकुळे यांना टोला

>> प्रमोद जाधव, पुणे

शेतकर्‍यांनी किंवा सर्वसामान्यांनी काही केले तर लगेचच अव्वाच्या सव्वा आणि संपुर्ण दंड सरकार वसुल करते. मात्र, सरकारने ९४ कोटी रुपयांचा दंड १७ लाखापर्यंत आणून मेघा इंजीनियरिंगवर एवढा डिस्काऊंट का आणि कुणाच्या आदेशाने देतंय? महाराष्ट्र सरकार तोडपाणी करतंय की इलेक्टोरल बाँडच्या देणगीचं ऋण फेडतंय? असा सणसणीत टोला आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वृत्तपत्रातील निनावी जाहिरातीवरुन आमदार रोहित पवार यांनी या भाजपकडून नव्हे तर मित्र पक्षाच्या मंत्र्यांकडून देण्यात आल्याचा दावा केला होता. त्यानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी सिध्द करण्याचे आव्हान दिले. त्यावर पवार यांनी तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का? असा सवाल बावनकुळे यांना केला. यावर बावनकुळे यांनी तुम्ही फारच मोठा शोध लावला. महसूलमंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला ९० कोटींचा दंड माफ केला, हा आरोप सिद्ध करा. नाहीतर राजकीय संन्यास घ्या, असे सांगत रोहित पवारांना आव्हान दिले होते. पत्रकारपरिषदेत घेत रोहित पवार यांनी या आव्हानालाही जोरदार पलटवार केला.

रोहीत पवार म्हणाले, भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी ११ जुलै २०२५ रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला बावनकुळे यांनी महसूल मंत्री म्हणून उत्तर दिले आहे. दिलेले उत्तर आणि प्रश्न तुम्हीच बघा, तुम्ही फक्त दंडच माफ केला नाही तर जप्त केलेले साहित्यदेखील परत करण्याचे आदेश दिले होते, हे विसरलात का? असे पुराव्यानिशी सांगत पवार यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले, वर्तमानपत्रात बेनामी जाहिरात दिली गेली का? कंत्राटदार किंवा व्यवसायिकांनी ही जाहिरात दिली का? सरकारकडून त्या कंत्राटदाराला काही फायदा झाला का? ९० कोटींचा महसूल विभागाकडून फायदा करून देण्यात आला. मेघा इंजिनिअरकडून इलेक्शनमध्ये सर्वात जास्त पैसा भाजपला आला होता. मी निवृत्ती घ्यायची का नाही याचा अधिकार तुम्हाला नाही, मी पुरावे दिले आहेत. आता तुम्ही जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी जाहिरात दिली जाते. काही कंत्राटदार किंवा बिल्डर जाहिरात देत असतो, फुकट जाहिरात कुणी देत नाहीत. काही कंत्राटदार आणि बिल्डर यांनी जाहिरातीसाठी पैसे दिले आहेत. या जाहिरातीसाठी १०० ते २०० कोटी रुपये खर्च झाला आहे. या जाहिरातीत नक्कीच काळंबेर झाले असल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठा आणि ओबीसी आरक्षण यावर रोहित पवार म्हणाले, सर्व समाजाला विश्वासात घेऊन मार्ग काढणे आवश्यक आहे. मराठा ओबीसीमधील आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल तर संसदेत मार्ग निघू शकतो, कायदा करण्याची गरज आहे.

हाकेंसमोर पडळकर यांचे उदाहरण

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करतात. यावर रोहीत पवार म्हणाले, लक्ष्मण हाके यांचे काही चुकत नाही, ते त्यांच्यापुढे उदाहरण भाजप आमदार गोपीचंद पडळकर ठेवतात. देवेंद्र फडणवीस यांची सवय आहे की, बहुजन समाजाचे नेते आपल्याकडे घ्यायचे आणि त्यांना शरद पवारांच्या विरोधी बोलायला लावायचे त्यासाठी त्यांना मंत्रिपदाच आमिष दाखवायचे त्याचप्रमाणे गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आले आणि शरद पवार यांच्या विरोधात बोलायला लागले. आता ते भाजपाच्या दृष्टीने मोठे नेते झाले आहेत. आणि त्याचा कार्य बद्दल त्यांना आता आमदारकी देण्यात आली आहे. हाके यांना पडळकर यांच्याप्रमाणेच बनायचे असल्याने ते पवारांच्या विरोधात बोलत आहेत.