मुद्दा – पालघर-ठाणे जिल्हा रेल्वेने कधी जोडणार?

<<< दयानंद पाटील >>>

सागरी-डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वात मोठ्या ठाणे जिह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 पासून नव्याने पालघर हा राज्यातील 36वा जिल्हा अस्तित्वात आला. दि. 16 एप्रिल 1853 ला भारतात प्रवासी रेल्वे बोरीबंदर (मुंबई) ते ठाणेदरम्यान सुरू झाली, परंतु 2014 पर्यंत जवळ जवळ 161 वर्षे पालघर आणि ठाणे एकत्रितपणे असताना या जिह्यातून रेल्वे एकमेकांशी जोडली नव्हती. ती आजही जोडली गेली नाही. खरोखरच ही शरमेची बाब तर आहेच, परंतु विकासाचे ध्येय कोणी अंगीकारले नाही याची खंतसुद्धा आहे. आजही पालघर विभागातील प्रवाशांना दादर गाठून मध्य रेल्वेच्या मार्गे ठाणे येथे जावे लागते. अशा परिस्थितीत पर्यायी मार्ग म्हणजे वसईहून कोपर रेल्वे स्थानक येथे उतरून ठाणे स्थानक गाठता येते, परंतु वसईमार्गे जाण्यासाठी गाड्यांची संख्या पाहता प्रवास अत्यंत कठीण असा आहे.

डहाणूपासून आजच्या घडीला ठाणे, भिवंडी ते पनवेलपर्यंत जाणारी आणि येणारी प्रवासी संख्या खूप मोठी आहे. डहाणू ते वसई तसेच बोरिवली येथील प्रवासी, जे कार्यालयीन कामकाजानिमित्ताने ठाणे येथे तर भिवंडी, नवी मुंबई, पनवेल येथे औद्योगिक कारखाने, वेअरहाऊस निर्माण झाल्याने कामगार, प्रवासी खूप मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात, परंतु या रेल्वेमार्गावरील धावणाऱ्या गाड्या अतिशय कमी प्रमाणात तर आहेतच, तथापि दोन गाड्या धावण्यामधील अंतर तीन-तीन तासांचे आहे. आपण सोबतच्या वेळापत्रक तक्त्यात पाहू शकता.

आज डहाणू – ठाणे मेमू, डहाणू-पनवेल मेमू, डहाणू-दिवा मेमू तसेच वसई-भिवंडी मेमू अशा प्रकारच्या गाड्या धावणे अपेक्षित असून किमान सकाळ/संध्याकाळी अर्ध्या अर्ध्या तासाने मेमू सेवा कशा प्रकारे धावू शकतात याचे वेळापत्रक आखणी करून तशा गाड्या सुरू करणे आवश्यक आहे. वसई-पनवेल उपनगरीय विभाग जाहीर होऊन खूप काळ उलटला आहे, परंतु या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या खूप कमी असल्याने तसेच तुटपुंज्या गाड्या आणि त्याही कधी वेळेवर धावत नाहीत. त्यामुळे येथील प्रवाशांना वारंवार आंदोलन करावे लागते, परंतु रेल्वे काही लक्ष देत नाही. जर त्यांनी या मार्गावर उपनगरीय गाड्या वाढवल्या तर प्रवाशांचा फायदा होईलच आणि रेल्वेचे उत्पन्नही वाढेल.

आज सर्व थरांतील प्रवाशांना त्रासदायक प्रवास करावा लागतो आहे. म्हणून डहाणू-पनवेल मेमू गाड्यांची संख्यासुद्धा वाढविणे आवश्यक आहे. वसईपर्यंत येणाऱ्या मेमू डहाणूपर्यंत विस्तारित करणे आवश्यक आहे तरी पालघर, भिवंडी आणि ठाणे जिह्याचे लोकसभा खासदार, नालासोपारा, वसई-विरार विधानसभा आमदार महोदय लक्ष घालून हा प्रश्न नक्कीच सोडवतील अशी अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात या रेल्वेमार्गावर बदल दिसून येईल अशी आशा आहे.