हिंदुस्थानी महिलांचा डझनवारी वार, सिंगापूरचा धुव्वा उडवत सुपर-4मध्ये धडक

हिंदुस्थानी महिलांनी दे दणादण डझनवारी गोल करीत सिंगापूरचा 12-0 फरकाने धुव्वा उडवत थाटातच महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये धडक दिली. या एकतर्फी लढतीत हिंदुस्थानकडून नवनीत कौर आणि मुमताज यांनी गोलची हॅट्ट्रिक साजरी केली.

चीनच्या हांगझोऊ शहरात ही स्पर्धा सुरू आहे. सोमवारी झालेल्या लढतीत हिंदुस्थानकडून नवनीत कौर आणि मुमताज यांनी प्रत्येकी 3 गोल करत सिंगापूरला निष्प्रभ केले. लालरेम्सियामी, उदिता, शर्मिला आणि रुतुजा पिसल यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात भर घातली. आता सुपर-4 फेरीत हिंदुस्थानचा सामना 10 सप्टेंबरला ‘अ’ गटातील दुसऱया क्रमांकाच्या संघाशी होणार आहे.

हिंदुस्थानची धडाकेबाज सुरुवात

सामना सुरू होताच आक्रमक झालेल्या हिंदुस्थानकडून मुमताजने दुसऱयाच मिनिटाला गोल करत खाते उघडले. त्यानंतर 11 व्या मिनिटाला नेहा आणि 13व्या मिनिटाला लालरेम्सियामीने गोल केल्याने हिंदुस्थानने पहिल्या झटक्यातच 3-0 अशी मुसंडी मारली. 14 व्या मिनिटाला नवनीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत चौथा गोल नोंदवला. दुसऱया सत्रातही हिंदुस्थानी महिलांचा गोलचा धडाका सुरूच राहिला. नवनीतने 20व्या आणि 28व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. दरम्यान, उदितानेही पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यामुळे हिंदुस्थानने मध्यंतरापर्यंतच 7-0 अशी भरभक्कम आघाडी घेतली.

मग तिसऱ्या क्वार्टरमध्ये मुमताजने 32व्या आणि 39व्या मिनिटाला गोल करत स्वतःची हॅट्ट्रिक पूर्ण केली. 38व्या मिनिटाला नेहाने दुसरा गोल केला. 45व्या मिनिटाला शर्मिलाने गोल करून हिंदुस्थानला 11-0 फरकावर नेले. चौथ्या क्वार्टरमध्ये 53व्या मिनिटाला रुतुजा पिसलने गोल करत हिंदुस्थानच्या डझनभर गोलचा आकडा पूर्ण केला. या एकतर्फी लढतीत सिंगापूरच्या महिला अक्षरशः निष्प्रभ दिसल्या.

‘ब’ गटात हिंदुस्थान अव्वल

‘ब’ गटात हिंदुस्थानने जबरदस्त खेळ करत अव्वल स्थान मिळवले. हिंदुस्थानने 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आणि 1 बरोबरीत सोडवला. गट फेरीत हिंदुस्थानी संघाने एकूण 25 गोल केले, तर केवळ 2 गोल स्वीकारले. 23 गोलफरकासह हिंदुस्थानने 7 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. जपाननेही सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला. या संघानेही 3 पैकी 2 सामने जिंकले आणि 1 बरोबरीत सोडवला. जपाननेही 17 गोल करत केवळ 2 गोल स्वीकारले आणि 15 गोल फरकासह 7 गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले.