
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पक्षाचा व्हीप लागू होणार नसल्याने खासदार हे खऱ्या अर्थाने मतदार ‘राजा’ ठरणार आहेत. गुप्त मतदान पद्धती व अंतर्गत असंतोषामुळे एनडीएला क्रॉस वोटिंगची चिंता सतावत आहे.
इंडिया आघाडीच्या खासदारांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सोमवारी बैठक झाली. त्यात निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत
लोकसभा व राज्यसभेतील खासदार
मतदान करतात. सध्या राज्यसभेत 238 तर लोकसभेत 543 खासदार आहेत. हे सर्व मतदानासाठी पात्र आहेत. बीआरएस व बीजेडीने मतदानात भाग न घेण्याची घोषणा केल्याने प्रत्यक्ष मतदारांचा आकडा 770 पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 386 असेल. संसदेत एनडीएकडे 427 खासदारांचे बळ आहे.
बीआरएस, बीजेडी तटस्थ राहणार
तेलंगणातील के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती व ओडिशातील बिजू जनता दलने मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली आहे. बीआरएसचे 4 खासदार आहेत तर, बीजेडीचे 7 खासदार आहेत. आंध्रातील जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने एनडीएला पाठिंबा जाहीर केला आहे. मागील वेळेसही त्यांनी हीच भूमिका घेतली होती. लोकसभेत 7 अपक्ष खासदार आहेत. त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
सुदर्शन रेड्डी विरुद्ध राधाकृष्णन
उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी व एनडीएचे सीपी राधाकृष्णन यांच्यात लढत होत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून रेड्डी यांनी खासदारांशी भेटीगाठींचा धडाका लावला आहे. सार्वजनिक व्यासपीठांवरून व पत्रकार परिषदांतून ते भूमिका मांडत आहेत. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.