
सलग सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गोराई बीचवर गेलेल्या पर्यटकांची मिनी बस खवळलेल्या समुद्रात फसली आणि प्रचंड घबराट पसरली. बसमध्ये सहा ते सात पर्यटक होते. उंच लाटांच्या तडाख्यात बस समुद्रात खेचली गेली. नंतर बराच वेळ ती बस लाटांवर हेलकावे खात राहिली. बसमधील पर्यटकांनी मच्छीमार आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर उडय़ा मारल्या. सुदैवाने मोठा अपघात टळला. रविवारी सायंकाळी हा थरार घडला.
लाटांच्या तडाख्यात पर्यटकांच्या बसला चारही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढले. नंतर ती बस हेलकावे खात खोल समुद्राच्या दिशेने जात होती. त्यामुळे पर्यटक मदतीसाठी आरडाओरड करीत होते. यावेळी स्थानिक मच्छीमार, अग्निशमन दल आणि जीवरक्षकांनी धाव घेतली. त्यांच्या मदतीनंतर पर्यटकांनी बसमधून उडय़ा मारल्या. नंतर पर्यटकांना सुरक्षितरीत्या किनाऱयावर आणण्यात आले आणि समुद्रात अडकलेली बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात आले. बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
संपूर्ण रात्रभर बस समुद्रातच
पर्यटकांची वेळीच सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र लाटांचा जोराचा मारा सुरूच राहिल्याने बस समुद्रातून बाहेर काढणे मुश्कील बनले. त्यामुळे संपूर्ण रात्रभर ती बस समुद्रातच अडकून पडली होती. अखेर सोमवारी सकाळी दोरीच्या सहाय्याने बस समुद्राबाहेर काढली. बंदी असतानाही चालकाने बस चौपाटीवर कशी नेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.