सावधान! अशी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते; नेपाळमधील अराजकतेवरून संजय राऊत यांचा इशारा

नेपाळमधील अराजकता आणि हिंसक आंदोलनांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांनी X वर एक पोस्ट करत म्हटले की, “अशी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते. सावध राहा! भारत माता की जय! वंदे मातरम्!” नेपाळमधील सरकारच्या हुकूमशाही कारभार आणि भ्रष्टाचाराविरोधातील जनक्षोभावरून त्यांनी हा इशारा दिला आहे.

X वर केलेल्या आपल्या आणखी एका पोस्ट मध्ये संजय राऊत म्हणाले आहेत की, “नेपाळमधील राजकीय संकटामुळे पंतप्रधान केपी ओली यांना राजीनामा द्यावा लागला, कारण नागरिकांनी भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. हिंदुस्थानच्या भारताच्या सीमेलगत पसरलेल्या या अशांततेचा हिंदुस्थानी धोरणकर्त्यांनी गांभीर्याने अभ्यास करावा, अशी मागणी केली जात आहे.”

नेपाळमध्ये सोमवारी सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आणि सोशल मीडियावरील बंदीच्या निषेधार्थ तरुणाई रस्त्यावर उतरली. संतप्त तरुणांनी पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या निवासस्थानावर दगडफेक केली, तर संसदेच्या इमारतीला आग लावली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 20 जणांचा मृत्यू झाला, तर 400 हून अधिक जण जखमी झाले. या हिंसक आंदोलनामुळे घाबरलेल्या सरकारने देशभर संचारबंदी लागू केली आणि काठमांडू येथे लष्कराला पाचारण करत ‘दिसताक्षणी गोळी मारण्याचे’ आदेश दिले. या तणावपूर्ण परिस्थितीत पंतप्रधान केपी ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री कॅबिनेट बैठकीनंतर सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली. मात्र, यानंतरही आंदोलक शांत झाले नाहीत. उलट, आंदोलन अधिक तीव्र झाले आणि आंदोलकांनी काठमांडूमध्ये अनेक ठिकाणी कब्जा मिळवला. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली, तसेच पोलिसांवर दगडफेक केली. या आंदोलनाला राजकीय पाठबळही मिळत आहे. अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले असून, राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीच्या 21 खासदारांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. रवि लामिछाने यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने संसद भंग करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.