महादेवपुराप्रमाणे चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघातही मतचोरी, एफआयआर दाखल, पण अद्याप चौकशी नाही

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करत भाजप व निवडणूक आयोगाची भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे चंद्रपूर जिह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही मतचोरी झाली. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे, पण 11 महिने झाले तरी अद्याप याप्रकरणी कोणतीही चौकशी अथवा कारवाई झालेली नाही. पोलीस व संबंधित प्रशासन लपवाछपवी करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवत्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अतुल लोंढे राजुरा मतदारसंघात कशाप्रकारे मतचोरी झाली याची माहिती दिली. लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात 55 हजार मतदार वाढले. 1 ते 15 ऑक्टोबर 2024 दरम्यान 11 हजार 667 मतदारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांच्या तक्रारीनंतर 6853 नावे डिलीट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

  • ऑनलाइन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे आयपी ऍड्रेस, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही, असा आरोप लोंढे यांनी केला.
  • राजुरा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराकडे 61 लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

न्यायालयात दाद मागणार

राजुरामधील मतचोरीप्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाईसंदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरीप्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच, पण आता याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येईल असे अतुल लोंढे म्हणाले.