राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती

देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला.

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक झाली. नव्या उपराष्ट्रपतींची निवड सर्वसहमतीने होईल, अशी अपेक्षा होती, मात्र सत्ताधारी एनडीएने विरोधी पक्षांशी सल्लामसलत न करता परस्पर उमेदवार जाहीर केला. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीने लढण्याचा निर्णय घेतला व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माजी न्यायमूर्ती रेड्डी यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे रंगत वाढली होती.

संसदेच्या दोन्ही सभागृहांतील एकूण 781 खासदारांपैकी 767 खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 752 मते वैध ठरली, तर 15 मते बाद झाली. त्यामुळे विजयासाठी 377 मते आवश्यक होती. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली तर, प्रतिस्पर्धी रेड्डी यांना 300 मते मिळाली.

‘इंडिया’ला 40 टक्के मते

एनडीएचा केवळ गणिती विजय झाला आहे, मात्र राजकीय व नैतिकदृष्ट्या पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी दिली. 2022 च्या निवडणुकीत विरोधकांच्या उमेदवाराला केवळ 26 टक्के मते मिळाली होती. यावेळी ‘इंडिया’ आघाडीच्या रेड्डी यांना 40 टक्के मते मिळाली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

निकाल भलेही माझ्या बाजूने नसेल, पण…

‘लोकशाही मूल्यांवरील अतूट विश्वासासह मी हा निकाल स्वीकारतो. हा प्रवास माझ्यासाठी सन्मानाचा होता. निकाल भलेही माझ्या बाजूने लागलेला नसेल, पण आम्ही एकत्रितपणे ज्या व्यापक उद्दिष्टाचा पाठलाग करू इच्छित आहोत, ते उद्दिष्ट कायम आहे. वैचारिक संघर्ष अधिक जोमाने सुरू राहील. लोकशाही केवळ विजयानेच नव्हे तर संवाद, मतभेद आणि सहभागाच्या भावनेनेदेखील मजबूत होते, अशी प्रतिक्रिया सुदर्शन रेड्डी यांनी निकालानंतर दिली.