आयुष कोमकर हत्या प्रकरण, कुख्यात बंडू आंदेकरसह 8 जणांना अटक

गृहकलहातून तरुणावर पिस्तुलातून  गोळ्यांचा वर्षाव करीत खून करणाऱ्या आंदेकर टोळीच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित आंदेकर कुटुंबीय एकाच मोटारीतून बुलढाण्याच्या दिशेने प्रवास करीत असताना त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे, तर यापूर्वी दोघा हल्लेखोरांसह रेकी करणाऱया चौघांना अटक केली होती. याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. उर्वरित पाच जणांच्या शोधार्थ पोलीस पथके मागावर आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक उपस्थित होते.

 यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण, सुजल मेरगु, बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वृंदावनी वाडेकर  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आयुष ऊर्फ गोविंद कोमकर (19, रा. नाना पेठ) असे खून केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कल्याणी कोमकर (37)  यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

आंदेकर खुनातील आरोपी गणेश कोमकर याचा मोठा मुलगा आयुष कोमकर हा एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तो 5 सप्टेंबरला त्याच्या 12 वर्षांच्या लहान भावाचा क्लास झाल्यानंतर दुचाकीवरून घरी इमारतीच्या पार्पिंगमध्ये आला. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या यश पाटील आणि अमन पठाण यांनी आयुषवर पिस्तुलातून गोळ्यांचा वर्षाव केला. तब्बल 11 गोळ्या झाडून हल्लेखोरांनी त्याच्या शरीराची चाळण केली. प्रकरणातील दोघा हल्लेखोरांना गुन्हे शाखेने तातडीने अटक केली होती. त्यानंतर इतर सहाजणांना अटक केली आहे.