पागडीच्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावा; आदित्य ठाकरे यांनी घेतली म्हाडा उपाध्यक्षांची भेट

पागडीअंतर्गत येणाऱया अत्यंत धोकादायक इमारतींबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पागडी एकता संघाच्या पदाधिकाऱयांसह आज म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. पागडीच्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मुंबईत 13,800 पेक्षा अधिक इमारतींमध्ये 10 लाख पुटुंबे गेली 70 वर्षांहून अधिक काळ राहत आहेत. यापैकी बहुतांश इमारती जीर्णावस्थेत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाडेकरूंना हक्क देणारे म्हणजेच मालकाने पुनर्विकासास नकार दिल्यास भाडेकरूंना तो करण्याचा अधिकार देणाऱया कायद्यात बदल करण्यात आले होते. मात्र आता हे बदल ‘कायदेशीररीत्या सक्षम प्राधिकरण, संस्था कोण?’ या कारणास्तव थांबविण्यात आले आहेत, याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले.

भाडेकरूंना पुनर्विकासाचा अधिकार देणाऱया दुरुस्तीच्या न्यायालयीन प्रकरणांवर तातडीने निकाल देण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी तसेच 1965 पूर्वीच्या सर्व उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्पष्ट निर्देश द्यावा, जो मालक किंवा भाडेकरूंना लागू होईल, या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर बैठकीत आम्ही भर दिला, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. बैठकीला शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब उपस्थित होते.