पाईपलाईन फुटली… मंत्रालयासमोर पाणीच पाणी

मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील आज सकाळी पाण्याची भूमिगत पाईपलाईन फुटली. त्यामुळे मंत्रालयाच्या परिसराला सकाळी नदीचे स्वरूप आले होते. पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी रस्त्याची एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती.

मंत्रालयाच्या समोरील पाईपलाईनच फुटल्यामुळे पालिका अधिकाऱयांची एकच धावपळ उडाली. पालिका अधिकाऱयांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. पाईपलाईनमधील पाण्याला प्रचंड दाब होता. त्यामुळे काही मिनिटांतच मंत्रालयाच्या समोरील रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूककोंडी झाली होती. मंत्रालयाकडून मरीन ड्राईव्हला जाणारा रस्ता खचला होता. पाईपलाईन फुटली तेव्हा पाण्याने उसळी घेतल्यामुळे मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांचीही धावपळ उडाली. पाण्याचा निचरा होईपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. संध्याकाळी उशिरापर्यंत पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू होते.