‘रो-को’ला हिंदुस्थानी ‘अ’ संघातून खेळण्याची गरज नाही!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करण्यासाठी ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरतील, अशी शक्यता जोरदारपणे वर्तवली जात होती. मात्र आज जाहीर झालेल्या हिंदुस्थान ‘अ’ संघातून या दोन्ही दिग्गजांची नावे गायब झाल्याचे पाहून त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटाबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र या दोघांनाही सराव सामन्यात खेळण्याची गरज नसल्याचे निवड समितीने स्पष्ट केले आहे.

दोन्ही खेळाडूंनी अलीकडेच फिटनेस चाचण्या उत्तीर्ण करून आपण फिट असल्याचे सिद्ध केले होते आणि आपण क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले होते. असे असूनही निवड समितीने त्यांना हिंदुस्थान ‘अ’ संघाच्या सामन्यांत उतरवण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय घेतला आहे. ‘त्यांना गेम-टाईम हवा असेल तरच ते खेळतील,’ अशी अधिकृत भूमिका मांडण्यात आली.

निवड समितीने नेतृत्वासाठी दोन वेगवेगळय़ा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. पहिल्या सामन्यासाठी रजत पाटीदार कर्णधार असणार असून, दुसऱया व तिसऱया सामन्यासाठी नेतृत्वाची धुरा तिलक वर्माकडे सोपवण्यात आली आहे. या संघात रियान पराग, आयुष बदोनी, रवी बिष्णोई, अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंह यांसारख्या देशांतर्गत क्रिकेट व आयपीएलमधील तडफदार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा हे शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात सहभागी होतील.

हिंदुस्थान अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ मालिकेचे वेळापत्रक

30 सप्टेंबर, 3 आणि 5 ऑक्टोबर

  • ठिकाण ः ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर, n वेळ ः दुपारी 1.30 वा.
  • हिंदुस्थान ‘अ’ संघ (पहिला सामना) ः रजत पाटीदार (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (यष्टिरक्षक), रियान पराग, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, विपरज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंह, युधवीर सिंह, रवी बिष्णोई, अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), प्रियांश आर्या, सिमरजीत सिंह.
  • हिंदुस्थान अ संघ (दुसरा व तिसरा सामना) ः तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह (यष्टिरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंह, युधवीर सिंह, रवी बिष्णोई, अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), हर्षित राणा, अर्शदीप सिंह.