
समाजासमाजात कटुता वाढेल असे निर्णय राज्य सरकारकडून घेतले जात आहेत. सरकार सर्वांचे असावे. समिती एका जातीची असू नये असे नमूद करतानाच आरक्षणाचा प्रश्न सरकारला सोडवायचा आहे का, असा खडा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवतेय, सामाजिक ऐक्याला तडा जातोय हे धोकादायक असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.
नाशिकमध्ये स्वामीनारायण मंदिर सभागृहात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकदिवसीय शिबीर पार पडले. त्याच्या समारोपप्रसंगी शरद पवार बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, सरकारने हैदराबाद गॅझेटवर निर्णय घेण्याचे सांगितले. हे गॅझेट मी दोनदा वाचले, त्यात काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. व्हिजेएनटी, बंजारा यांना आदिवासींचे स्थान देण्यात आले आहे. मात्र त्यांना आदिवासींमध्ये घेण्यास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे. समाजासमाजामध्ये कटुता निर्माण होईल असे निर्णय घेतले जात आहेत. या विषयाकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन योग्य दिसत नाही. सरकारला हा प्रश्न सोडवायचा आहे की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत ओबीसींशिवाय अन्य समाजाचा समावेश नाही. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखालील मराठा समाजासाठी नेमलेल्या समितीत गिरीश महाजन यांच्याशिवाय अन्य समाजाचा समावेश नाही. खरंतर समिती सर्वसमावेशक असायला हव्यात. सरकार हे एका जातीचे किंवा समाजाचे नाही. सर्वांसाठी एक समिती असायला हवी, ती कोणत्याही विशिष्ट जातीची नसावी. हा विषय योग्य प्रकारे हाताळला जात नसल्याने सामाजिक वीण उसवायला लागली आहे, हे धोकादायक असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. सामाजिक ऐक्याच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण समाजामध्ये कटुता कमी करून सरळपणाने या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मदत करण्याची भूमिका राष्ट्रवादीची असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
या वेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संघटनात्मक बांधणी आणि पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. आमदार जितेंद्र आव्हाड, पैगंबर शेख आदींची भाषणे झाली. या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, हेमंत टकले, धैर्यशील मोहिते-पाटील, मर्जिचा पठाण, श्रीराम शेटे, खासदार नीलेश लंके, भास्कर भगरे, आमदार रोहित पवार, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी हजर होते.
राहुल गांधी मोदींना हायड्रोजन बॉम्ब भेट देणार – जयंत पाटील
विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरीमुळे पराभव झाला. पक्ष फोडले, काही पक्ष चोरले, तेवढय़ावरही समाधान झाले नाही, म्हणून देशात आता मतचोरी सुरू झाली आहे, असा आरोप माजी मंत्री जयंत पाटील यांनी केला. 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे, याच दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांना हायड्रोजन
बॉम्ब भेट देणार आहेत, याकडे देशाचे लक्ष लागून आहे. राज्य सरकारच्या महायुतीत वर्चस्वाची लढाई सुरू असल्याने निवडणुका केव्हा होतील हे सांगता येत नाही. राज्यात प्रशासकीय राजवटीमुळे विकास खुंटला असून सरंजामशाही सुरू असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
आज आक्रोश मोर्चा
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून सकाळी साडेदहा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार हे स्वतः यात सहभागी होणार आहेत. कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करा, नवीन कर्ज वाटपात सिबीलची अट रद्द करा. कांद्याची मुक्त निर्यात सुरू करून प्रतिकिलो 10 रुपये अनुदान द्या, शेतीमालाला हमीभाव द्या. भावांतर योजना तत्काळ लागू करा यासह शेतकऱयांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात येणार आहे.
मतचोरी कशी होते… सायबरतज्ञाने प्रात्यक्षिकच दाखवले
सायबरतज्ञ अनाथ प्रभू यांच्यासह दोघांनी ईव्हीएम मशीनमधून मतदान चोरी कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मतचोरीची उदाहरणे पुराव्यासह सादर केली. मतदार नोंदणी व त्याच्याशी संबंधित फॉर्मच्या त्रुटी याबाबत मार्गदर्शन केले. याच वेळी आमदार उत्तम जानकर यांनी आपल्या मतदारसंघात झालेल्या मतदान चोरीची व निवडणुकीतील हेराफेरीची माहिती सांगितली.