
>> योगेंद्र ठाकूर
दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव 1926 मध्ये गाजला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या सामाजिक व धार्मिक क्रांतीमुळे. त्या वेळी त्यांनी उचललेले हे पाऊल क्रांतिकारक आणि ऐतिहासिक ठरले. त्याचे असे झाले की, दादरच्या गणेशोत्सवातील गणेशमूर्तीची पूजाअर्चा ब्राह्मण मंडळी करीत असत. त्यावेळी इतरांना गणेशपूजा करणे वर्ज्य होते. प्रबोधनकार नुकतेच पुण्याहून मुंबईस राहण्यास आले होते. गणेश पूजनातील भेदभाव त्यांच्या कानी पडला. सार्वजनिक गणेशोत्सव हा समस्त हिंदूंचा. सर्व समाजघटकांना सार्वजनिक गणेशोत्सवातल्या गणेशमूर्तीचे पूजन करण्याचा हक्क मिळायला हवा, तो हक्क तेव्हा सर्वांना मिळावा म्हणून बहुजन समाजातील तरुण मंडळी आग्रही होती. तेव्हा गणेशमूर्तीची पूजा सर्व समाजघटकांना करता यावी म्हणून प्रबोधनकारांनी पुढाकार घेतला. साथीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर होतेच. वातावरण अधिक बिघडू नये म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव कमिटीचे डॉ. जावळे, डॉ. आंबेडकर, प्रबोधनकार, डॉ. भोळे आदी चार-सहा जणांची यावर चर्चा झाली आणि अखेर तोडगा निघाला. पुजाऱयाने गणेशाची प्राणप्रतिष्ठापूर्वक शास्त्राsक्त पूजाअर्चा करावी. ती झाल्यावर दलित व्यक्तींनी पुष्पगुच्छ गणपतीला वाहण्यासाठी पुजाऱयाला द्यावा असे सामोपचाराने ठरले. जे आधी कधीही घडले नव्हते. पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सवाचे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले.
पुढे दादरमध्ये प्रतिवर्षी होणारा सार्वजनिक गणेशोत्सव बंद पडला. गणेशोत्सव बंद झाला तेव्हा ही उणीव भरून काढलीच पाहिजे असे प्रबोधनकारांना वाटू लागले आणि मग काय, प्रबोधनकारांनी सर्व स्नेह्यांची, समविचारी लोकांची एक बैठक बोलावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राची मुख्य देवता मायभवानी होती. तिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तद्वार. तिचा नवरात्र महोत्सव हाच वास्तविक महाराष्ट्राचा राष्ट्रीय महोत्सव हे प्रबोधनकारांनी सर्वांना पटवून दिले. यापुढे आपण नवरात्रोत्सव साजरा करण्याचा परिपाठ चालू करून बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी जुन्या ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन करावे ही सूचना मांडली. त्यासाठी ‘लोकहितवादी संघ’ स्थापन केला. त्यामुळे 1926च्या पूर्वी मुंबईत किंवा महाराष्ट्रात कुठेही प्रघात नसलेला ‘श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव’ साजरा करण्याचा मान दादर-मुंबईला मिळाला आणि त्याचे जनक ठरले प्रबोधनकार ठाकरे. समस्त हिंदू जनांना बंधुभावाने समाविष्ट करून सहभाग घेता येईल असा नवरात्र महोत्सव प्रबोधनकारांना हवा होता. या संकल्पनेत निर्धाराने लोकहितवादी संघाच्या माध्यमातून या नवरात्र महोत्सवास कुलाबा ते कल्याण आणि गिरगाव ते पालघरपर्यंतची मराठी हिंदू जनता त्यांच्या मागे एकजुटीने उभी राहिली. या पहिल्या नवरात्र महोत्सवासाठी लोकांकडून देणग्या येऊ लागल्या. मंडपाचे सामान, घट, देवीची तसबीर, समया, भगवे झेंडे, वाजंत्री, ढोलताशे अशा अनेक वस्तू त्या मंडपात मागितल्या की, दुसऱया क्षणाला येऊ लागल्या. मराठी दुकानदार, व्यापारी मंडळी, लोकहितवादी संघाचे पदाधिकारी आणि समस्त मराठी जनता घरचा उत्सव असल्याप्रमाणे हा पहिलावहिला नवरात्र महोत्सव भव्य-विशाल साजरा करण्यासाठी भक्तिभावाने सहभागी झाले होते.
आश्विन शुद्ध प्रतिपदेचा दिवस उजाडला. सनई, चौघडा वाजू लागला. आबालवृद्ध, स्त्री-पुरुष, मुलामुलींची अगदी गर्दी जमू लागली. लोकहितवादी संघाचे सगळे पुढारी हजर झाले. रा. ब. बोले अध्यक्ष या नात्याने सगळ्यांचे आगत स्वागत करू लागले. प्रथम श्री शिवरायांचा भगवा झेंडा उभारण्याचा मान त्या वेळचे आमदार सोळंकी यांना दिला. नंतर घटस्थापना हा धार्मिक विधी दलित दांपत्याकडून करविला. पूजाविधी दादरचे विख्यात महाशय पालयेशास्त्री यांनी यथाशास्त्र केला. नंतर आरती. कविवर्य वसंत विहार ऊर्फ जोशी यांनी जगदंबेची आरती रचली होती. आबालवृद्धांनी एकसुरात आरतीचे गायन केले. आरतीला रा. ब. बोले उभे होते. दादरमध्ये एक अगदी नव्या थाटामाटाचा महोत्सव गर्जू लागला. सबंध दिवसभर दर्शनासाठी लोकांची, प्रामुख्याने महिलांची वर्दळ अखंड चालू झाली. स्पृश्यास्पृश्य भेद कोणाच्याही खिजगणतीत उरला नाही. एकजात मराठी माणूस जगदंबेचे कन्या-पुत्र नात्याने सरमिसळ वावरू लागला. रात्रीच्या कार्यक्रमांना पाच-पाच, सहा-सहा हजारांची गर्दी होऊ लागली. दसऱयाच्या मिरवणुकीला पोलीस परवानगी देईनात. कारण काय? तर म्हणे अशी मिरवणूक दादरला पूर्वी कधी निघालेली नव्हती. रा. ब. बोले, केळुसकर मास्तर, नवलकर वकील यांनी सरळ सांगितले की, ‘‘अहो, पुत्रच जन्माला आला नव्हता, तेव्हा बारशाचा प्रश्नच नव्हता, पण यंदा तो जन्मलाय. तेव्हा बारसे झालेच पाहिजे नि आम्ही ते करणारच करणार.’’ नंतर परवानगी मिळाली. सबंध मुंबईतून लेझीमवाले, मल्लखांबवाले, भजनी फड, आपापले ताफे घेऊन हजर झाले. 12 वाजता जगदंबेची महापूजा नि सार्वजनिक आरती झाल्यावर शिलंगणाची स्वारी धूमधडाक्यात पार पडली. अशा तऱ्हेने पहिल्या नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. या उत्सवाचे लोण मुंबई-महाराष्ट्रभर फोफावत गेले. या नवरात्र महोत्सवाचे जनकत्व प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडेच जाते.